रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे औचित्य साधून ‘माझी माती, माझा देश’ उपक्रम सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्ताने बुधवारी क्रांतीदिनी ‘पंचप्राण शपथ’ शहरातील ज्येष्ठ नागरिक संजीवनी वेलणकर यांच्या घरी घेण्यात आली. विशेष म्हणजे महाविद्यालयीन युवक, युवती, शेतमजूर, बागायतदार, वकिल, डॉक्टर, गृहिणी अशा समाजातील विविध घटकांना सोबत घेत शपथ घेण्यात आली. शहरातील विलकर कुटूंबियांमध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनादिवशी भारत मातेचे पूजन करण्यात येते. दोन पिढ्या हा भारत मातेच्या पूजनाचा सोहळा अखंड सुरू आहे. संजीवनी यांचे वडिल राजाराम विलणकर यांचे वडिल व पत्नीसह १९४२ च्या लढ्यात सहभागी झाले होते. भारत देशाबद्दल असलेल्या विलक्षण प्रेमामुळेच राजाराम दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक या दोन्ही राष्ट्रीय सणाला घरात भारतमातेची पूजा करीत असत. १९९६ पर्यंत वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी पूजा केली. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्यांची कन्या संजीवनी यांनी भारतमाता पूजनाचा उपक्रम अद्याप सुरू ठेवला आहे. क्रांतीदिनीही भारतमातेची पूजा करून त्यांनी ‘पंचप्राण शपथ’ घेतली. यावेळी चंद्रकांत मार्इंगडे, विमल मार्इंगडे, प्रमोद सावंत, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अॅड. सलोनी शेडगे, डॉ. कोमल सुतार, दीप्ती वहाळकर, विजया देव, मनीषा वालावलकर शपथ घेण्यासाठी उपस्थित होत्या.
समाजातील विविध घटकांसमवेत संजीवनी विलणकर यांनी घेतली पंचप्राण शपथ
By मेहरून नाकाडे | Published: August 09, 2023 11:52 AM