रत्नागिरी : शहरानजिक औद्योगिक वसाहतीत राहणारे फर्निचर व्यावसायिक संतोष माचकर यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून तयार केलेल्या कोकण रेल्वेच्या चलचित्राने अनेकांना आकर्षित केले आहे. ९ सप्टेंबर दुपारपर्यंत हा देखावा पाहाता येणार आहे. माचकर गेली ३५ वर्षे विविध विषयांवर चलचित्र बनवीत आहेत.संतोष माचकर यांचे परटवणे येथे घर असून पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या या घरी घरी कोकण रेल्वेचे चलचित्र बनविले होते. या चलचित्रानेही अनेकांना आकर्षित केले होते. सध्या फर्निचर व्यवसायानिमित्त संतोष माचकर औद्योगिक वसाहतीत रहायला गेले आहेत. कोरोनाच्या काळानंतर म्हणजेच दोन वर्षानंतर यावर्षी सर्वत्रच गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षी त्यांनी सध्या रहात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील घरी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. तसेच यावेळीही चलचित्र देखावा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुठला विषय घ्यावा, हे त्यांना सुचेना. अखेर, त्यांच्या मुलांनी पुन्हा कोकण रेल्वेचा देखावा करण्याचा आग्रह धरला. तो अंतिम मानून माचकर यांनी हा चलचित्र देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला.माचकर यांचा फर्निचर व्यवसाय पारंपारिक असल्याने पिढीजात त्यांच्यात ही कला आहे. त्यांचे वडील आणि काका पुर्वी गणपतीच्या मागे फिरते चक्र तयार करीत असत. यातूनच संतोष माचकर यांना हा चलचित्र देखावा करण्याची प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे त्यांचा मुलगाही इंटेरिअर डेकोरेटर असल्याने त्याचीही यासाठी त्यांना मदत झाली. १५ दिवसांत त्यांनी हा देखावा तयार केला.
रत्नागिरीतील संतोष माचकरांचा 'कोकण रेल्वे'चा देखावा आकर्षित
By शोभना कांबळे | Published: September 05, 2022 7:30 PM