मंडणगड : तालुक्यातील पाचरळ, पणदेरी, म्हाप्रळ रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांनी याबाबत होत असलेल्या चौकशीत दिरंगाई होत असल्याबद्दल दुसऱ्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी सकाळी घोसाळकर यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, दुपारनंतर बांधकाम विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयात आले. त्यानंतर उपोषणकर्ते घोसाळकर व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेमध्ये कोणतीही ठोस उत्तरे न मिळाल्याने घोसाळकर यांनी आपले उपोषण कायम ठेवले.
या विषयासंदर्भात घोसाळकर यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित विभागाने त्यांना गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे लेखी उत्तर दिले होते. त्यामुळे घोसाळकर यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर दोनदा चौकशी समितीने या कामांची प्रत्यक्ष स्थळावर जावून पाहणी केली.
याबाबतचा अहवाल संबंधित विभागाकडे सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही ठोस भूमिका बांधकाम विभागाकडून घेण्यात येत नसल्याने घोसाळकर यांनी पुन्हा १४ डिसेंबर रोजी उपोषण सुरू केले आहे.गैरव्यवहाराच्या तक्रारीची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेतली जात नसल्याचे घोसाळकर यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांच्याविरोधात घोसाळकर यांची तक्रार आहे, अशाच अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील चौकशी केली जात असल्याने घोसाळकर यांनी बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.