लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गाव देवळात ग्रामस्थांतर्फे सापड या भांगलणी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. सापड शेतीतील एक भांगलणीचा पारंपरिक प्रकार असून, सध्या सापड म्हणजे काय हे नवीन पिढीला माहीत नाही. त्यामुळे ते पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंत्रवली गाव देवळात गर्दी केली होती.
कोकणात पूर्वी भात शेतीबरोबर नाचणी, वरी, हरिक, बरीक, आदी तृणधान्याबरोबर कांग, आदी पिके घेतली जायची. कोकणात बारमाही शेतीची कामे चालतात. त्यामध्ये प्रथम मशागतीसाठी गवत काढणे, कवलं तोडणे, पातेरी गोळा करणे, भाजवळ, साकुळ काढणे, पेरा करणे, फोड, बेर, लावणी, भांगळणी आणि मग कापणी हे सारे सुरूच असते.
ग्रामदेवतेला श्रीफळ वाढवून सापडला सुरुवात होत असे. यावेळी भांगलणी करण्यास आलेले शेतकरी भांगलणीस्थळी अर्धकोर बसत असत, त्यांच्या पाठी, झांज, हलगी, थाळी, मृदूंग, वाजंत्री आदी वाद्य घेऊन वाजविणारे वाजपी सज्ज असत. गावच्या गावकर, मानकरी, आदी प्रतिष्ठित ग्रामस्थांनी हुकूम देताच हलगी घुमू लागे. हलगी घुमू लागली की, जाणकार मंडळी वाजंत्रीवाल्यांच्या बाजूला येऊन खड्या आवाजात पारंपरिक गाणी गाण्यास सुरुवात करीत असे. वाद्य आणि वाजंत्रीच्या सुराबरोबर गाण्याच्या तालावर भांगलणीला सुरुवात होत असे.
एकामेकाला ढकळत, शेतातील रोप हलक्या हाताने बाजूला करत रोपामधील वाढलेले गवत काढले जात असे. यावेळी चढाओढीची गाणी गात, एखाद्याला कोपरखळी मारत हा खेळ रंगत असे, कधी कोणावर चिखलफेक, तर कधी काढलेले गवत अंगावर फेकत मौजमजा करत ते शेत भांगलून केव्हा व्हायचे हे समजायचंच नाही, बरे ज्याच्याकडे सापड असेल तो त्या वेळच्या ऐपतीप्रमाणे जेवण वा नाश्टा देत असे. (त्यावेळी पैशाला महत्त्व नव्हते) त्यावेळी गावातीलच नाही तर सापड पाहायला आलेलेही या खेळात सामील होत असत.
------------------
गवत काढणी म्हणजेच ‘सापड’
भांगलणी ही साधारण श्रावणात सुरू होते. पूर्वी नाचणी, वरी, हरिक, आदी रोपांतील वाढलेले गवत काढण्यासाठी सापड घालण्याची प्रथा होती. त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडाफार विरंगुळा मिळेल, थोडीफार मोजमजाही होईल आणि कामही होईल हा मुख्य हेतू असे. ज्याच्या शेतात सापड असे तेथे सकाळपासूनच धावपळ चाललेली पाहायला मिळे. थोड्या वेळाने गावातील व परिसरातील इतर शेतकरी हातामध्ये विळा, खुरपे, आदी भांगलणीला लागणारे साहित्य घेऊन जेथे सापड असेल तेथे जमत असत.