सरत्या वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारी, घात-अपघातांच्या घटनांनी जिल्हावासियांना हादरवून टाकले. दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या शशिकांत राणे याच्या सॅफरॉन कंपनीचा महाघोटाळा, रत्नागिरीत अल्पवयीन मुलीचे काही प्रतिष्ठितांकडून झालेले लैंगिक शोषण, तसेच मोठ्या प्रमाणातील घरफोड्या या सर्वांचे २०१४ या सरत्या वर्षावर सावट होते. यापुढेही सॅफरॉन प्रकरणाचे सावट राहणारच आहे. आपली मुद्दल तरी वसूल व्हावी, अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांची असून सॅफरॉन प्रकरणातील फसवणूक झालेल्या साडेतीनशेवर लोकांनी तक्रारी देऊनही त्यांची गुंतवलेली सुमारे १२ कोटींपेक्षा अधिक रक्कम अद्यापही त्यांना परत मिळालेली नाही. प्रत्यक्षात सुमारे १५०० पेक्षा अधिक लोकांनी सॅफरॉनमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु भीतीपोटी अनेकांनी पोलिसात तक्रार केलेलीच नाही. त्यामुळे सॅफरॉनने केलेली आणखी काही कोटी रुपयांची फसवणूक उजेडात येऊ शकलेली नाही. सॅफरॉननंतर रत्नागिरीकरांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या हिम्बज हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडच्या रत्नागिरी रेल्वे स्टेशन फाट्याजवळ प्रमिला कॉम्प्लेक्स फेज १ मधील कार्यालयाचे दोन गाळे सील करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखा कक्ष ७ च्या गुन्हे अन्वेषण विभागाने (मुंबई) विशेष सत्र एम. पी. आय. डी. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. हिम्बजकडून गुंतवणूकदारांची किती कोटींची फसवणूक झाली, याचा शोध लागायचा आहे. दामदुप्पट लाभाच्या प्रलोभनापोटी लाखो रुपये गुंतविलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुहागर, चिपळूणमध्येही शाईन नावाच्या गुंतवणूक कंपनीने अनेक प्रलोभने दाखवत गुंतवणूकदारांची करोडो रुपयाची फसवणूक केली. फसवणूक होऊनही अनेकांना शहाणपण आलेले नाही. कोकण रेल्वे मार्गावरील अपघातांनीही वर्ष गाजलेकोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी अपघातांचे प्रमाण घटले असले तरी आता नवीन समस्या निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात या मार्गावर मालगाड्यांचे चार, तर प्रवासी गाडीचा एक असे पाच मोठे अपघात झाले. रायगड जिल्ह्यात प्रवासी गाडीला झालेल्या अपघाताचे मोठे सावट जिल्ह्यावर होते. तसेच उक्षी व अन्य ठिकाणी झालेल्या मालवाहतूक गाड्यांच्या अपघातांमुळेही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.घरफोड्या; तपास थंडावलारत्नागिरी जिल्ह्यात २०१४ मध्ये घरफोड्या, चेन स्नॅचिंग यांचे प्रमाण खूप होते. या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना म्हणावे तसे यश आले नाही. काही अपवादात्मक घरफोड्यांतील चोरट्यांचा तपास लागला. परंतु मोठ्या प्रमाणातील घरफोड्यांमागील गुन्हेगार अद्याप मोकाटच आहेत.रत्नागिरी शहरात २०१४ मध्ये एकाच दिवशी तीन अपार्टमेंटमधील १४ पेक्षा अधिक फ्लॅट फोडण्यात आले होते. रत्नागिरी शहरात व जिल्ह्यात काही सराफी पेढ्याही फोडण्यात आल्या. या सर्व चोऱ्यांमध्ये श्वानपथकाचा वापरही करण्यात आला. परंतु चोरट्यांचा माग काही लागला नाही. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून, अद्याप चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. रत्नागिरीतील वासनाकांडाने प्रतिमा काळवंडली...रत्नागिरी शहरात २०१४ मध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणातून उघडकीस आलेल्या वासनाकांडप्रकरणाने जिल्हाभर खळबळ उडवून दिली. या प्रकरणात शोषण झालेल्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ७ आरोपींना अटक करण्यात आली होती. प्रत्यक्षात या प्रकरणात ४० पेक्षा अधिक आरोपी असावेत, असा दावा केला जात होता. मात्र, दावा करणारेही नंतर शांत झाले. न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असताना फिर्यादी मुलीसह सर्वच साक्षीदार फितूर झाल्याने अखेर यातील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले.
सॅफरॉन, वासनाकांडाचे सावट--घरफोड्या; तपास थंडावला
By admin | Published: December 26, 2014 11:36 PM