चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा प. पू. डॉ. हेडगेवार पुरस्कार वितरण सोहळा दि. १८ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी डॉ. हेडगेवार स्मृती मंडळातर्फे ग्रंथालयाला दीड लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्या व्याजातून दर दोन वर्षांनी डॉ. हेडगेवार पुरस्कार देण्याची विनंती केली होती. ११ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी पुणे येथील सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या यमगरवाडी प्रकल्पाला तसेच जनकल्याण समितीच्या दुष्काळ निवारण कार्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. दि. १८ डिसेंबर रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजचे डॉ. गो. बं. देगलूरकर यांना हा पुरस्कार यावर्षी दिला जाणार आहे. यापूर्वी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला २००८मध्ये भागवत आले होते. त्यावेळी ते संघाचे सहकार्यवाह होते. ग्रंथालयाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)
सरसंघ चालक भागवत १८ डिसेंबरला चिपळुणात
By admin | Published: November 02, 2014 11:36 PM