रत्नागिरी : कंत्राटदाराच्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना राजीवलीचे (ता. संगमेश्वर) सरपंच आणि उपसरपंच यांना रत्नागिरीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळा रचून ताब्यात घेतले.तक्रारदार हे कंत्राटदार असून मित्राच्यावतीने राजीवली ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील पाखाडी तयार करण्याचे काम त्यांनी केले होते. या कामाचे बिल व सध्या पूर्ण झालेल्या कामांचे बिल ग्रामपंचायतीकडून मंजूर व्हायचे होते. मात्र, या बिलांच्या मंजुरीसाठी राजीवलीचे सरपंच प्रशांत शिर्के,आणि उपसरपंच सचिन पाटोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी ४० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. या रक्कमेपैकी १५ हजार रूपये सरपंच प्रशांत शिर्के याला व १५ हजार उपसरपंच सचिन पाटोळे याला गुरूवारी देण्याचे ठरले.रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंध विभागाला ही माहिती मिळताच लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रूपये घेत असताना या दोघांनाही रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० हजार रूपये हस्तगत करण्यात आले असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईत पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, प्रवीण ताटे, सहायक पोलिस फाैजदार संदीप ओगले, हवालदार विशाल नलावडे, महिला पोलिस हवालदार श्रेया विचारे, पोलिस नाईक दीपक आंबेकर, शिपाई राजेश गावकर व चालक प्रशांत कांबळे यांचा समावेश होता.
Ratnagiri: तीस हजारांची लाच स्वीकारताना राजीवलीचे सरपंच, उपसरपंच लाचलुचपतच्या जाळ्यात
By शोभना कांबळे | Updated: May 11, 2023 16:56 IST