दापोली : दापोली येथील कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांची शनिवारी महाबळेश्वर येथे सहल गेली होती. जाताना या बसला महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह दापोलीत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी १० जणांचे मृतदेह दापोली दाखल झाले होते तर रविवारी (29 जुलै) उर्वरीत मृतदेह दाखल झाल्यानंतर आप्तेष्टांच्या अश्रूंचा बांध फुटला. अत्यंत शोकाकूल परिस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी हे मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी आपल्या घरी आणले. हे मृतदेह घरी येताच आप्तेष्टांनी हंबरडाच फोडला. दापोलीतील गावी हे मृतदेह आल्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुर्घटनेतील मृतांचे कुटुंबीय शोकाकुल
या अपघातात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेने शोकाकुल झाले आहेत. मयत सचिन गुजर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व पाच बहिणी असा परिवार आहे. संदीप सुवरे यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई व एक भाऊ आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. विनायक सावंत हे फोंडाघाट येथील राहणारे असून, ते लिपीक म्हणून कार्यरत होते. नीलेश तांबे यांचा विवाह मे महिन्यातच पार पडला. ते चंद्रनगर - दापोली येथील राहणारे असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा परिवार आहे. रितेश जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार आहे. तर सुनील कदम यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुली. राजू बंडबे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांची पत्नी प्राथमिक शिक्षिका आहे. पागडे यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.
सकाळी नऊ वाजेपर्यंत चॅटिंग केलं
सहकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवर फोटोही पाठवले. सकाळी नऊ वाजेपर्यंत चॅटिंग सुरु होतं. मात्र, त्यानंतर आपला संपर्कच तुटला, असे प्रवीण रणदिवे म्हणाले. रणदिवे हे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आहेत.
कुणी कुणाला सावरायचे?
अपघातात मृत पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी हे कर्मचारी म्हणजेच कर्ते होते. घरातील कर्ता व्यक्तीच निघून गेल्याने या मृतांच्या घरावर शोककळा पसरली आहे. मात्र, दापोली आणि परिसरावर एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळला की यातून कोणी कोणाला सावरायचे, हाच प्रश्न पडला आहे.
अफवा, चर्चा, संभ्रम आणि गोंधळ
अपघाताचा प्रकार झाल्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअॅपवर एकापाठोपाठ एक मेसेज धडकू लागले. त्यातून बसमधल्या प्रवाशांचा आकडा, बस नेमकी किती फूट खोल दरीत कोसळली, याबाबतची वेगवेगळी माहिती पुढे येत होती. त्यामुळे संभ्रम वाढत गेला. दापोली कृषी विद्यापीठाला एकतर सुट्टी होती आणि ही घटना घडल्याचे कळताच महत्त्वाचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे नेमकी आणि अधिकृत माहिती कोणाकडूनही मिळत नव्हती. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संभ्रमाची अवस्था होती.
कृषी विद्यापीठ सुनेसुने
दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ सोमवारपासून सुनसान असेल. कारण कोकण कृषी विद्यापीठाने अनेक महत्वाचे कर्मचारी गमावले आहेत. एकाच कार्यालयातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ आहे.
रोशनचे आईवडील अडकले पंढरपूरमध्ये
अपघातग्रस्त बसमधील रोशन तबीब (हर्णै) याचे मार्च महिन्यात लग्न झाले होते. त्याचे आई-वडील आषाढीसाठी पंढरपूरला गेले आहेत. मोर्चा आणि आंदोलनांमुळे ते तेथेच अडकून पडले आहेत. रोशन याच्या पश्चात एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. लग्नानंतर चार महिन्यातच त्याला काळाने ओढून नेले आहे. याच बसमधील पंकज कदम आणि नीलेश तांबे या दोघांचा विवाहही नुकताच झाला होता. नीलेशचा विवाह तर मे महिन्यातच झाला होता. अपघातग्रस्तांमध्ये बहुतांश कर्मचारी २५ ते ४० या वयोगटातील आहेत. घराची जबाबदारी अंगावर घेतानाच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली आहे.