रत्नागिरी : दरवर्षी पावसाळी सहल काढण्यात येते. आठवडाभरापूर्वीच वर्षा सहलीचं नियोजन सुरू होतं. सुरूवातीपासूनच माझं सहलीला जायचं अथवा नाही, हे पक्कं ठरत नव्हतं. काम असल्यामुळे जायचं नाही परंतु एकीकडे मित्रांसोबत जायचं, असं वाटत होतं. शुक्रवारी सायंकाळीदेखील मला मित्रांचा फोन आला, चल म्हणून. पण अखेर मी नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर शनिवारी सकाळी 11.30 वाजता फोन आला व अपघाताची माहिती मिळताच हादरा बसला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आपण वाचलो, याचा प्रत्यय आल्याची माहिती कोकण कृषी विद्यापिठातील वरिष्ठ लिपीक संतोष महादेव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सर्व मित्रमंडळी मजेत सहलीला निघाली होती. आठवडाभर सहलीचे नियोजन झाले होते. सकाळी ७ वाजता मंडळींची गाडी सुटली होती. मात्र, 11.30 वाजता गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी माझ्यासमवेत असलेल्या सर्व सहकारी कर्मचाºयांना हादराच बसला. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सहलीला गेलेल्यांच्या नातेवाईकांना काय सांगावे, हादेखील प्रश्न होता. अपघाताच्या वृतानंतर विद्यापिठातील कर्मचारी एकत्र आलो. 15 ते 20 गाड्या करून तातडीने अपघातस्थळी दुपारी 2 वाजता पोहोचलो. अपघाताचे ठिकाण पाहूनच हादरा बसला.
अपघातातील विनायक सावंत (फोंडा) व दत्तात्रय रायगुडे (खंडाळा-सातारा) येथील आहेत. उर्वरित सर्वजण स्थानिक आहेत. अपघातात वाचलेले प्रकाश सावंतदेसाई यांची आम्ही भेट घेतली. सुमारे 400 फूट खाली बस कोसळल्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पोलादपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत असले तरी मित्रांचे मृतदेह पाहून अश्रू थांबत नव्हते.
पत्नीची श्रद्धा फळाला आली...
माझी पत्नी दर रविवारी बैठकीला जाते. शिवाय माझी अन्य काही कामे होती. त्यामुळे नाईलाजाने अखेर सहलीला येण्यास मित्रांना नकार दिला. परंतु, अपघाताचे वृत्त ऐकताच माझ्या पत्नीची श्रध्दा तसेच दैवकृपेने आपण वाचलो, असे राहूनराहून वाटत असले तरी आपण चांगल्या सहकाºयांना गमावल्याचे दु:ख मोठे आहे. शिवाय सहकारी मित्रांची कुटुंब उद्ध्वस्त झाली असून, त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे, हेच कळत नाही, असे पवार म्हणाले.