मंडणगड : पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी प्रमोद रमेश जाधव (३५) यांच्यावर रविवारी माहू गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रमोद जाधव हे मूळचे मंडणगड तालुक्यातील माहू या गावचे रहिवासी होते. २०१३मध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठात परीक्षा विभागात क्लार्क म्हणून सेवेत रूजू झाले होते.
दि. २८ रोजी ते दापोलीहून आपल्या सहकाऱ्यांसोबत महाबळेश्वर येथे सहलीकरिता जात असताना आंबेनळी घाटात त्यांची बस पाचशे फूट दरीत कोसळली. या अपघातात एक कर्मचारी सुखरूप बचावला आहे.मात्र, उर्वरित सर्व कर्मचारी मृत झाले. यामध्ये प्रमोद जाधव यांचा समावेश आहे. वृत्त समजताच तालुक्यातील आर. पी. आय.चे दादा मर्चंडे, आदेश मर्चंडे, राजेश गमरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले.
सायंकाळी ७.३० वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर रात्री ९ वाजता माहू येथे आणण्यात आला. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माहू येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंबाला नाहक मानसिक त्रासआईने सांगितलेले रविकिरण याने ऐकल्याने सहलीला जाणे टाळले. त्यामुळे आज त्यांचे प्राण वाचले आहेत. या अपघाताच्या बातमीत रविकिरण मृत झाला असल्याची माहिती पसरल्याने अनेक मित्र नातेवाईकांनी फोनवर चौकशी केल्याने कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला.आईचं ऐकलं अन् जीव वाचला...गैरसमजाच्या महितीमुळे मंडणगडमध्ये गोंधळ उडाला होता. या सहलीकिरता मंडणगड शहरातील मूळ दुर्गवाडी येथील व सध्या राहणार दापोली येथील रविकिरण साळवी हेदेखील जाणार होते. मात्र, आईने सहलीस जाण्यास मनाई केल्याने त्यांचे प्राण वाचले.
रविकिरण हे कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेत असून, शनिवारी गेलेल्या सहलीत तेदेखील जाणार होते. मात्र, त्यांच्या चार महिन्यांच्या मुलाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या आईने मुलाला बरे नसताना तू सहलीला जाऊ नकोस, असे सांगितले.