ठळक मुद्दे मृतदेह घरी येताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा, अनेकांचे हात सरसावलेअंत्यसंस्काराला प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती
रत्नागिरी : सकाळी ते घरातून सांगून बाहेर पडले... घरी परतणारच नाही, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती... घरी येणाऱ्या माणसाच्या मृत्यूची बातमी आली आणि सारेच हादरून गेले. आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.
संतोष जालगावकर हे (वडाचा कोंड) शिक्षण संचालनालय कार्यालयात काम करत होते. सचिन गिम्हवणेकर (गिम्हवणे) हे संशोधन संचालक कार्यालयात, तर सुनील कदम हे (विद्यापीठ कॉलनी, मूळ खेर्डी) अधीक्षक, निम्नस्तर शिक्षण विभागात काम करत होते. हे तिघे सहलीसाठी शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गेले होते. मात्र, आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत या तिघांचा मृत्यू झाला.
सचिन गिम्हवणेकर यांच्या घरी पत्नी, आई, भाऊ आणि श्रीशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा भाऊ हंगामी कर्मचारी म्हणून विद्यापीठात काम करत आहे. त्यांचा मृतदेह शनिवारीच ताब्यात देण्यात आला होता. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यापीठाच्या वस्तू भंडार सोसायटीवर सचिव म्हणून ते काम करत होते. तसेच दापोली रोहिदास समाजन्नोती मंडळाचे सचिव म्हणूनही काम करत होते.संतोष जालगावकर यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. त्यांच्या घरी वयोवृद्ध आई, पत्नी, पारस व पराग ही दोन मुले आहेत. पारस हा नववीत, तर पराग हा सातवी शिकत आहे. त्यांचा मृतदेह आज (रविवारी) त्यांच्या घरी आणण्यात आला. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने त्याठिकाणी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनील कदम यांच्या घरी पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. पत्नी खेर्डी येथील पोस्टात काम करत आहे. त्यांचा एक मुलगा लांजा येथे एका बँकेत उपशाखाधिकारीपदावर काम करत आहे. दुसरा मुलगा मुंबई येथे एमसीए करत असून, मुलीने पीएच.डी. केली असून, हंगामी तत्त्वावर ती विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करत आहे. त्यांचा मृतदेहदेखील आजच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खेर्डी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आधारच हरपलाआंबेनळी अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष जालगावकर आणि सचिन गिम्हवणेकर हे त्यांच्या कुटुंबांचा आधार होते. वडिलांच्या पश्चात त्यांनीच आपल्या घराला सावरले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबियांचा आधारच हरपला आहे. पत्नींच्या पदरात चिमुकली लेकर देऊन ते काळाच्या पडद्याआड निघून गेले.