खेड : आमचा सचिन गेलाच नाही. अपघाताची माहिती आम्ही टी.व्ही.वर पाहिली. परंतु, आम्हाला अद्यापही विश्वास आहे सचिन जिवंत आहे, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. शनिवारी दापोली येथील कृषी विद्यापिठाच्या कर्मचा-यांची सहल महाबळेश्वर येथे गेली होती. जाताना या बसला महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात अपघात झाला. या अपघातात बसमधील 30 जण प्राणास मुकले. या अपघातात मृत्यू पावलेले वणंद येथील सचिन गुजर हे कृषी विद्यापिठाच्या बांधकाम विभागात कार्यरत होते. सचिन यांचे काही नातेवाईक या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. पण सचिन यांच्या अपघाती जाण्याने वणंद गावावर शोककळा पसरली आहे.
ही दुर्देवी घटना टी.व्ही.वर पाहिली, असे ग्रामस्थांनी सांगितले. परंतु, आमचा सचिन या अपघातात गेलाच नाही, अशी भोळी आशा सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी बोलून दाखवली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांनी सचिनच्या घराकडे धाव घेतली. परंतु, घरी वयोवृद्ध वडील, सचिनची पत्नी व दोन लहान मुले यांच्या व्यतिरिक्त सचिनच्या घरी कुणीही नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनीदेखील त्यांच्या घरी जाताना थोडासा अंदाज घेतला. परंतु, घरी कुणालाही यासंदर्भांत कल्पना नसल्यामुळे ग्रामस्थांनीदेखील त्याच्या घरी फारशी कल्पना दिली नाही.
सचिन हा पायाने थोडासा अपंग होता. परंतु, त्याने त्याचे अपंगत्व त्यांच्या कामाच्या कधीही आड येऊ दिले नाही. गावातदेखील सचिन खूपच कृतिशील होता. गावच्या अमर विचार मंडळाचा तो उपाध्यक्ष होता. गावच्या सर्वच कार्यक्रमामध्ये तो हिरिरीने सहभागी होत असे. शनिवारी पहाटे सहलीला जातानादेखील पत्नी व वडिलांना तो उद्या परत येईन, असे सांगून निघून गेला होता, अशी माहिती सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी दिली.
सचिनचा चुलत भाऊ अविनाश याला ही दु:खद घटना समजल्यानंतर तो तत्काळ काही मित्रमंडळींना घेऊन घटनास्थळी गेला, अशी माहिती मिळाली आहे. परंतु, यासंदर्भात गावातील काही ग्रामस्थांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्यापही प्रशासनाच्या माध्यमातून तो मृत झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सचिन अद्यापही जिवंत आहे, अशी आमची भावना आहे.