दापोली : महाबळेश्वर येथे सहलीला जाताना झालेल्या अपघातात दापोलीतील संदीप सुवरे मृत पावले. संदीपच्या जाण्याने दापोलीवर शोककळा पसरली आहे. संदीपसारखे एक हुरहुन्नरी व्यक्तिमत्व गेल्याने दापोलीच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी माहिती दापोली विद्यापिठातील संदीपचे मित्र नंदकिशोर भागवत यांनी दिली.
संदीप हा दापोली नगरपंचायतीचा स्वच्छतादूतही होता. तर दापोली येथील नावाजलेल्या फ्रेंडशिप ग्रुपचा सदस्य होता. तसेच शिवप्रतिष्ठान हिंंदुस्थानचा दापोलीतील सर्वेसर्वा होता. संदीपच्याच माध्यमातून दापोलीमध्ये प्रथम दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. दापोलीतील एक उत्तम चित्रकार, रांगोळीकार अशीच त्याची प्रतिमा होता. कुठल्याही कार्यक्रमामध्ये हिरीरिने भाग घेणारा संदीप आत्ता आमच्यामध्ये नाही. ही उणीव आता आम्हाला कायमचीच भासत राहणार, हे मात्र नक्की असे सांगताना त्यांना शोक अनावर झाला.
दापोली विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमाचा कर्ताधर्ता तोच होता. दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतादूत म्हणून काम करताना त्याने विविधांगी दापोलीकरांच्या विषयाला हात घातला होता. दापोलीतील विविध महाविद्यालये, शाळा यामधून संदीप सुपरिचित होता. संदीपच्या माध्यमातून दापोली शहरामध्ये ‘होम मिनीस्टर’ कार्यक्रमाचेदेखील आयोजन दरवर्षी करण्यात येत होते.
त्यामुळे दापोलीत तो अगदी सर्व घराघरातून परिचित होता. दापोली तालुक्यातील प्रभूआळी येथील श्रीराम देवस्थानचा तो अध्यक्ष होता. या अपघातात संदीपच्या जाण्याने दापोलीच्या सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.