रत्नागिरी : कोरोनामुळे मृत झालेल्या मात्र सरकारच्या निकषात बसत नसल्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
रत्नागिरी : पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या शासन आदेशावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. याप्रकरणी याचिकेवर दि. २१ जून रोजी सुनावणी होणार आहे.
अकरावी प्रवेशाबाबत संभ्रम
रत्नागिरी : अकरावीची प्रवेश प्रक्रिया अनेक फेऱ्यांमध्ये राबवली जाते. मात्र, सीईटी घेतल्यास एक किंवा दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे दोन महिने लांबणीवर पडणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया काही दिवसात आटोपेल, असा विश्वास होत असला तरी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप संभ्रमावस्थाच आहे.
पाण्याची समस्या मार्गी
चिपळूण : तालुक्यातील माैजे गाणे राजवाडी येथे आमदार शेखर निकम यांच्या निधीतून बोअरवेल बसविण्यात आली आहे. एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण मात्र थांबली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पाण्याच्या पातळीत वाढ
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात काही दिवस पावसाचा मुक्काम राहिल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प व ४६ लघु प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र, अर्जुना प्रकल्पाची पाणीपातळी गतवर्षीपेक्षा कमी झाली आहे.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : तालुक्यातील गोळप दाभिळवाडी ते मोहल्ला या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. अनेक वर्षे गोळप दाभिळवाडी रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लभ झाल्यामुळे रस्ता निकृष्ट बनला आहे.
वादळग्रस्तांना मदत
राजापूर : काॅंग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. युवक काॅग्रेसचे अध्यक्ष नुईद काझी, तालुका उपाध्यक्ष हर्षद मांजरेकर यांनी हे साहित्य गावागावात नेऊन आपतग्रस्तांना वितरीत केले. यावेळी कुवेशीच्या सरपंच मोनिका कांबळे उपस्थित होत्या.
ऑनलाईन परिसंवाद
दापोली : मधमाशांचे सेंद्रिय शेतीतील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, दि. ३ जून रोजी ‘मधुमक्षिका पालनातून वाढवा सेंद्रिय शेतीमध्ये गोडवा’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले आहे. सेंद्रिय शेती ‘संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ स्थापन करणे, या प्रकल्पांतर्गत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
निकष बदलण्याची मागणी
देवरूख : खावटी कर्जाचे निकष बदलून चारपटीने कर्ज देण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा काॅग्रेसतर्फे काॅंग्रेस उपाध्यक्ष अशोक वालम यांनी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला गतवर्षी घेतलेल्या कर्जाच्या चारपटीने कर्ज मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागवेकर यांचा सत्कार
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील प्रशांत नागवेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यकारी अभियंता वृषभ उपाध्ये यांच्या हस्ते नागवेकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गाैरविण्यात आले.