प्रकाश वराडकर - रत्नागिरी पाटबंधारेच्या दक्षिण विभागाअंतर्गत जिल्ह्यात असलेल्या नातूवाडीवाडीसह एकूण २४ धरणांमधील पाणीपातळीत २५ फेब्रुवारी २०१५ अखेर सरासरी निम्म्याने घट झाली आहे. या धरणांमध्ये सध्या २८. ६१६ दशलक्ष घनमीटर अर्थात ५३.९६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २४ पैकी दोन धरणांमध्ये तांत्रिक कारणाने पाणीसाठाच उपलब्ध नाही. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूूत्रांकडून सांगण्यात आले.गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या विभागाअंतगर्त चिपळूण तालुक्यातील मालघर या एकमेव धरणात २५ फेब्रुवारीअखेर एकूण क्षमतेच्या ९०. ७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आंबतखोल धरणात ८८. ६९ टक्के, संगमेश्वरमधील तेलेवाडी धरणात ८५. ९५ टक्के व खोपड धरणात ८२.३५ टक्के पाणीसाठा असून पाणी स्थिती चांगली आहे. अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर, कडवई, शिपोशी, व्हेळ व झापडे या आठ धरणांत ६० टक्केपेक्षा अधिक व ८० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. हा साठा समाधानकारक आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिपोशी व व्हेळ या धरणांत उपयुक्त असा पाणीसाठा कमी राहत होता. या धरणांचे दुरुस्ती काम पूर्ण झाल्याने या दोन्ही धरणातील पाणी पातळी समाधानकारक आहे. जिल्ह्यातील या धरणांतील पाणी हे प्राधान्याने सिंचनाकरिता असून, प्रत्यक्षात सिंचनासाठी पाण्याचा वापर कमीच होत आहे. मात्र, या पाण्याचा अनेक नळपाणी योजनांना उपयोग होत आहे. या धरणांतील पाण्याचा वापर सिंचनाकरिता अधिक होण्याची अपेक्षा आहे. उन्हाळी शेतीसाठी या पाण्याचा अधिक उपयोग झाल्यास शेतीतून नक्कीच अधिक उत्पादन मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा साठापाच धरणात कमी पाणीया विभागाअंतर्गत असलेल्या खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात सध्या १३. ०२ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ४७. ८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. २३ लघूपाटबंधारे धरणांपैकी फणसवाडी (चिपळूण), निवे (संगमेश्वर), बेनी, गवाणे (लांजा) व कोंड्ये (राजापूर) या पाच धरणांमध्ये २५ फेब्रुवारी २०१५ अखेर असलेला उपयुक्त पाणीसाठा हा ३२ ते ४६ टक्के एवढा कमी आहे. केळंबे, बारेवाडी धरणे कोरडी !रत्नागिरी पाटबंधारे दक्षिण विभागाकडील जी दोन धरणे कोरडी आहेत, त्यांमध्ये लांजा तालुक्यातील केळंबे व राजापूर तालुक्यातील बारेवाडी लघू पाटबंधारे धरणांचा समावेश आहे. यांपैकी केळंबा धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. गळतीमुळे या धरणात पाणी साठा होत नाही. तर बारेवाडी धरणात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीसाठा होत नाही. गाळ उपसा काम येत्या काही कालावधीत हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी ही दोन्ही धरणे कोरडीच आहेत.
समाधानकारक पाणी
By admin | Published: February 25, 2015 10:54 PM