रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी भाजप व शिवसेनेतर्फे दि. १ ते ६ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रात सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दि. ४, ५ व ६ एप्रिल रोजी सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी शुक्रवारी (३१ मार्च) पत्रकार परिषदेत दिली.भाजप व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर गाैरव यात्रा रत्नागिरीत काढण्यात येणार आहे. या यात्रेचे नेतृत्व आमदार नितेश राणे करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दि. ४ रोजी देवरूख शहर, दि. ५ रोजी राजापूर व ६ रोजी रत्नागिरीतून गाैरव यात्रा निघणार आहे.
रत्नागिरी शहरात जिल्हा कारागृहातील सावरकरांच्या खोलीतील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तेथून गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तेथे सहविचार व्यक्त करण्यात येणार आहेत. सावरकर प्रेमींनी या गाैरव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.