आज पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक संघटना काम करीत आहेत. आपण त्यांना मदत करण्याची गरज आहे. नुकताच सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. यानिमित्ताने राज्यभरातील कृतिशील पर्यावरणप्रेमी शिक्षकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे नुकतीच परिषद झाली. झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन दिवसेंदिवस कमी होतो आहे. म्हणून सोसायटीत ऑक्सिजन देणारी छोटीछोटी झाडे लावायला हवीत, अशी भूमिका अनेकांनी मांडली. त्याला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्याची कल्पना मांडली गेली. शिवाय आजूबाजूच्या परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, पुनर्निर्माण, पुनर्वसन करण्याचा विचार केला गेला. आपला ‘संपूर्ण निसर्ग हा एक परिवार आहे’, ही भावना पर्यावरणात काम करताना सतत मनात असायला हवी, असेही यानिमित्ताने सांगण्यात आले. खरंच पर्यावरण रक्षण ही खूप चिंतेची बाब असून, समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत, काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यात मानवही आहे. मानवाने स्वार्थासाठी अधिक अर्थार्जन करण्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा दुरुपयोग केला आहे. विपूल नैसर्गिक साधन संपत्ती असूनही ती संपत आहे. वाढते शहरीकरण व लयास जाणाऱ्या पर्यावरणाला मानवच जबाबदार आहे. यातून प्रचंड प्रमाणात होत असणारी जंगलतोड व वाढते शहरीकरण हे संतुलन बिघडवत आहेत. हे असंतुलन खूप घातक ठरणार आहे. वास्तविक पाहता लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या परिणामांचा सामना करावाच लागणार आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची योग्य वाढ केली पाहिजे. पर्यावरणावर असले संकट येणार नाही, अशी भावना ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे. चिपळुणातील जागरूक नागरिक मंचाच्या तानू आंबेकर, श्रीधर पालशेतकर व अन्य सहकाऱ्यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आंब्याच्या बाटा व काही वृक्षांची बीज पेरले. याच पद्धतीने शासकीय जागेत, सोसायटीच्या मोकळ्या जागेत किंवा पडिक जमिनीत पर्यावरण रक्षणासाठी बीज पेरण्याची गरज आहे.
- संदीप बांद्रे