देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे खवले मांजराचे खवले जप्त करण्यात आले. ही कारवाई रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी केली. याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील चिखली पंडववाडीतील एकनाथ महादेव पंडव (वय ४९) याला ताब्यात घेतले आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी (दि-७) मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचला. संगमेश्वर-गोळवली येथील यादववाडी बसथांबा येथे एकजण खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व संगमेश्वर पोलीस स्थानकातील सहायक पोलीस निरीक्षक देशमुख व अंमलदार यांनी सापळा रचला हाेता.संगमेश्वर - गोळवली येथील यादव वाडी स्टॉप येथे एकजण संशयास्पद स्थितीत दिसला. त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता. त्याच्याकडे १ किलो ७०० ग्रॅम खवले मांजराची खवले सापडली. त्याचे नाव एकनाथ महादेव पंडव असे आहे. त्याला ताब्यात घेऊन संगमेश्वर पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख हे करीत आहेत. एकनाथ पंडव याला काल, शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई संगमेश्वर पोलीस स्थानकाचे सहायक पाेलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पाेलीस फाैजदार प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, अरुण चाळके, नितीन डोमणे, पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे यांनी केली. कारवाईकरीता वनविभागाचे आकाश तुकाराम कडुकर, पोलीस पाटील राजाराम धोंडिराम पाटील यांनी सहकार्य केले.
संगमेश्वरातील गोळवलीत खवले मांजराचे १ किलो ७०० ग्रॅमचे खवले जप्त, एक जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 12:28 PM