रत्नागिरी : खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कुवारबाव येथे खवले मांजराची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी सायंकाळी काही तरूण संशयितरित्या फिरत असताना कुवारबांव पोलिसांना दिसले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच सर्व प्रकार उघडकीला आला.
पोलिसांनी कसून तपासणी व चौकशी केली असता त्यांच्याकडे जिवंत खवले मांजर व एक मांडूळ जातीचा साप सापडून आला. त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.हे सर्व संशयित रत्नागिरी परिसरातीलच असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.