रत्नागिरी : बनावट साेन्याचे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर पाेलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा चंग बांधला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी चाैघांना अटक केली असून, आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या तीन गुन्ह्यांमध्ये ३७ लाख ७८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. अजूनही काही पतसंस्था, बँकांमधील फसवणुकीचे गुन्हे दाखल हाेणार असून, फसवणुकीचा आकडा अजून वाढण्याचा अंदाज आहे.राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक सहकारी पतसंस्थेतील चाेरीचा तपास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू हाेता. हा तपास सुरू असतानाच खाेटे दागिने गहाण ठेवून पतसंस्था, बँकांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश झाला. पाेलिसांनी वेगाने सूत्र हलवून काेल्हापुरातील सराफ अमाेल गणपती पाेतदार (४७, रा. शिवाजी पेठ, काेल्हापूर) याच्यासह त्याचे साथीदार प्रभात गजानन नार्वेकर (३२, रा. काेल्हापूर), याेगेश पांडुरंग सुर्वे (रा. कुवेशी, राजापूर) आणि अमेय सुधीर पाथरे (३४, रा. खांबडवाडी-पावस, रत्नागिरी) या चाैघांना अटक केली आहे. या टाेळीने जिल्ह्यातील तब्बल ६ आस्थापनांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे.
या टाेळीने आतापर्यंत तीन आस्थापनांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या तीन गुन्ह्यांमध्ये चाैघांनी ३७ लाख ८७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. अजूनही काही पतसंस्था, बँकांमधून चाैकशी सुरू असून, फसवणूक झालेल्या आस्थापनांनी तक्रारी दाखल केल्यानंतर अन्य गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे फसवणुकीचा आकडा अजून वाढणार आहे.
सराफाकडे पाऊण काेटीची ‘माया’अमाेल पाेतदार हा प्रत्येक ताेळ्यामागे स्वत:ला २० हजार घेत हाेता. अन्य साथीदारांना उर्वरित २५ हजार देत हाेता. त्याच्यासह अमेय पाथरे व प्रभात नार्वेकर यांनी गेल्या दीड वर्षात काेट्यवधींची संपत्ती जमा केली आहे. अमाेल पाेतदार याच्याकडे पाऊण काेटीची संपत्ती असल्याचे पुढे आले आहे.
अटक केलेल्या चाैघांकडे कसून चाैकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फसवणूक झालेल्या पतसंस्था, बँका यांच्याकडे चाैकशी केली जात आहे. या बँका किंवा पतसंस्थांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील. सध्या अटक केलेल्या चाैघांसाेबत आणखी काेणाचा समावेश आहे का, याचाही आम्ही शाेध घेत आहाेत. - धनंजय कुलकर्णी, जिल्हा पाेलिस अधीक्षक.