देवरूख : देवरूख आगारातील चालक व वाहकांनी बुधवारी रिबुक न होण्याचा निर्णय अचानक घेतल्याने आगाराचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. यामुळे अनेक बस फेऱ्या न सुटल्याने प्रवाशांचे हाल झाले.
आगारात वाहकांची तब्बल ६० पदे रिक्त असल्याने प्रतिदिनी ४० ते ४५ वाहकांना रिबुक व्हावे लागते. यामुळे कामाचा अतिरिक्त भार या कर्मचाऱ्यांवर पडतो. यावरून एका कर्मचाऱ्याच्या निलंबन प्रकरणावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वाद धुमसत आहे. यामुळेच हे आंदोलन सुरू झाले आहे.
अचानक रिबुक न होण्याच्या या अनोख्या आंदोलनामुळे अधिकारीवर्ग चक्रावून गेला आहे. अधिकारीवर्गाला याबाबत काहीच कल्पना नसल्याने बसफेऱ्यांचे वेळापत्रक अक्षरश: विस्कळीत झाल्याचे दिसून आले. बुधवारी भरपावसामध्ये शेकडो प्रवासी व विद्यार्थी ताटकळत स्थानकावरच अडकून पडले होेते.
याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कोणत्याही संघटनेने हे आंदोलन पुकारले नसून, सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रिबुक न होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी करजुवे भागात दोन बसेसचा अपघात झाला होता. हा अपघात कसा घडला व का घडला, याची माहिती न घेताच अधिकारीवर्गाने अपघातातील संबंधीत चालकाला निलंबित केल्याचे आदेश काढल्याने हा रिबुकचा वाद उफाळून आला आहे.
या गाडीला ब्रेक लागत नाहीत, अशी सूचना संबंधीत चालकाने देऊनही तीच गाडी वारंवार दिली जात होती. बसेसचे पुढील टायर रिमोल्ड नसावेत, असा नियम असतानाही देवरूख आगारातील अनेक बसेसचे पुढील टायर रिमोल्डचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेक चालकांनी पत्रकारांसमोर मांडल्या.
अपघातग्रस्त बसचे टायरही रिमोल्ड असल्याने गाडीला ब्रेक लागत नव्हता. म्हणून अपघात झाल्याचे संबंधित चालकाने नमूद केले होते. अपघातातील नुकसानग्रस्त गाडीची भरपाई देत असतानाही या चालकाचे निलंबन केल्यामुळेच आगारातील सर्वच चालक व वाहकांनी रिबुक न होण्याचा निर्णय बुधवारी घेतला. चालकाची बाजू प्रशासनाने विचारात घेणे गरजेचे होते. तसेच यांत्रिक विभागाकडूनही माहिती घेणे आवश्यक होते.
यापैकी कोणत्याही बाबी न करता संबंधित चालकाचा बळी दिला. वारंवार डबल ड्युटी करून अशा प्रकारची वरिष्ठांकडून वागूणक मिळत असेल तर केवळ नियमित सेवाच करण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी चालक व वाहकांनी घेतल्याचे दिसून आले.