रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यातील २०७ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सोमवारी १९६ शाळाच भरल्या. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलमध्ये केवळ एकाच विद्यार्थ्याची उपस्थिती होती.जिल्ह्यात ४५८ माध्यमिक शाळा असून, नववीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या २२ हजार ५७९, दहावीची २३ हजार ३२८, अकरावी १७ हजार ७२६, बारावीची विद्यार्थी संख्या १९ हजार ५०३ इतकी आहे. जिल्ह्यातील अवघ्या १,२०८ पालकांनी शाळांना संमत्तीपत्र सादर केले आहे. कोरोनामुळे पालकांमध्ये अद्याप संभ्रम असल्याने शाळेत पाठविण्यासाठी बहुतांश पालकांनी नकार दर्शविला आहे.शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळत होता. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा शिक्षकांचीच संख्या अधिक होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाची तपासणी करूनच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत होता. शाळेच्या मुख्य दरवाजावर सॅनिटायझर, थर्मल गन ठेवण्यात आले होते. तसेच मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांचीही तपासणी करण्यात येत होती. पालकांनीच मुलांना शाळेत सोडण्याची सक्ती केल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी शाळेच्या परिसरात कमी दिसत होती.कोरोनाच्या काळानंतर सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत असली तरी येत्या काही दिवसात शंभर टक्के उपस्थिती दिसेल, असे माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सांगितले. तसेच शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. शाळेचा परिसर आणि वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरणही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेची घंटा वाजली, विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:27 PM
Coronavirus Unlock, school, ratnagiri शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यातील २०७ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सोमवारी १९६ शाळाच भरल्या. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलमध्ये केवळ एकाच विद्यार्थ्याची उपस्थिती होती.
ठळक मुद्देशाळेची घंटा वाजली, विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली रत्नागिरी शहरातील एका शाळेत केवळ एकच विद्यार्थी