रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा शासन निर्णयानुसार, मंगळवार दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळांची घंटा वाजली. मात्र, प्रत्यक्षात मुले वर्गात उपस्थित नव्हती. मात्र, शिक्षकांनी मुलांचे शब्दसुमनाने स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्याने, नवीन चेहऱ्यांची ओळख, तसेच मुलांशी शिक्षकांनी हितगुज केले.
जिल्हा परिषद, माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. ऑनलाइन अध्यापनाला शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप केले जाते. सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येतात. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी गतवर्षीच्या मुलांची पुस्तके सद्यस्थितीत उपलब्ध करून दिली आहेत.
ज्या गावात मोबाइल रेंज नाही, तेथील शाळा ग्रामस्थ, शिक्षक पालक संघाच्या परवानगीने प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आठवडाभरात ऑफलाइन व ऑनलाइन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे.