जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये क्रीडांगणाचा प्रश्न भेडसावत असतानाच दरवर्षी वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी शासकीय शाळा तसेच शासकीय जागेचा वापर केला जातो. हा उपक्रम चांगला असला तरी प्राथमिक, माध्यमिक शाळा परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षलागवड करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्राथमिक शाळा परिसरात स्वच्छतागृह, शौचालय आणि जागा मिळेल तिथे किचन शेड, अंगणवाडी इमारती बांधून प्राथमिक शाळांचा परिसर व्यापून गेला आहे. अनेक ठिकाणी इमारती अगर शौचालय बांधताना नियोजन नसल्याने जागेचा अपव्यय झाला आहे.
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना मैदानी खेळ, कवायत घेणे जागेअभावी शक्य होत नाही. असे असताना शाळांच्या आवारामध्ये प्रशासनाकडून वृक्षलागवडीचा उपकम राबविला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांकडून झाडांची जोपासना करणे, पाणी देणे यांसारख्या गोष्टी करता येतील. मात्र, वृक्ष लागवड उपकम चांगला आणि वातावरण संतुलनासाठी आवश्यक असला तरी विद्यार्थ्यांचे हक्काचे मैदान मात्र त्यात हरवून गेले आहे. विद्यार्थ्यांच्या कवायती, मैदानी खेळ कुठे घेणार असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहात आहे.
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी काही दानशूर व्यक्तींनी पूर्वी मोफत जागा दिल्या आहेत. काही शाळांच्या जागेचे क्षेत्रही मोठे आहे. पण, त्या जागेचा इमारत बांधताना किंवा अन्य उपक्रम राबविताना योग्य वापर होताना दिसत नाही. मिळेल तेथे मोकळ्या जागेत शौचालय, वर्गखोल्या, पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांच्या आवारात प्रशस्त जागा असूनही विद्यार्थ्यांना कवायतीसाठी, मैदानी खेळासाठी जागा शिल्लक नाही, अशी स्थिती अनेक शाळांमध्ये आहे.