अनिल कासारे लांजा : भावी पिढी घडविणारे ज्ञानमंदिरच आता माेडकळीला आल्याचा धक्कादायक प्रकार लांजा तालुक्यातील विलवडे येथील शाळा नं. २ येथे समाेर आला आहे. त्या शाळेत मुलांना शिकवणे धाेकादायक असल्याने शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांना बसवून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ आली आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे काेठे, असा प्रश्न आता पडला आहे.
शासनाने १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील शाळेचे छत सुरक्षित आहे की नाही, याची खातरजमा न केल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर शाळेच्या बाहेर बसण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील विलवडे शाळा नं. २ ही शाळा पहिली ते चाैथीपर्यंत असून, याठिकाणी १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत ३ वर्षापासून मोडकळीला आली आहे. शाळा व्यवस्थापन समिती शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून पाठपुरावा करत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षामध्ये शासनाने किंवा येथील लोकप्रतिनिधींनी शाळा दुरुस्ती गांभीर्याने घेतलेली नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक शाळेत येताच त्यांनी शाळेची दुरवस्था पाहिली. त्यानंतर त्यांनी मुलांना शाळेच्या पटांगणात शिकविण्यास सुरूवात केली.
शाळेचा निधी गेला कुठे?
विलवडे शाळा नं . २ कोसळण्याच्या स्थितीमध्ये असताना या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा आरोप येथील पालकांनी केला आहे. ही वस्तुस्थिती असेल तर, मग हा निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपूर्ण शाळा इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. मुले बसू शकत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे आपण गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे शाळा दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यावरूनच प्रशासनाचा आडमुठेपणा दिसून येतो. - सुरेंद्र खामकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती