लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: नवीन शैक्षणिक वर्ष दि. १५ जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, शाळांमध्ये शिकवायला शिक्षक कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न पालकांमधून केला जात आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक मिळत नसल्याची दयनीय स्थिती आहे. जिल्ह्यात सध्या १,८०३ जागा रिक्त आहेत.
जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी दाेन हजार ४९४ शाळांमध्ये प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय परिसर सजावटीसह नवागतांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात १० हजार ९५२ विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या ७३,३१० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थी स्वागताची लगबग सुरू असताना जिल्ह्यात १,८०३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अध्यापन करण्यासाठी शिक्षक हवे आहेत. एक शिक्षक किती वर्गांची जबाबदारी पेलणार आहे?
कोकणात शिक्षक रूजू झाल्यानंतर तीन-चार वर्षांच्या सेवेनंतर जिल्हा बदलीचे वेध लागतात. सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे. शिक्षकांची जिल्हा बदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. गेल्या १५ वर्षांपासून डी.एड्, बी.एड् धारक करत आहेत. यासाठी डीएड्, बी.एड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. दि. १५ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षक पहिल्या दिवशी शाळेत रूजू होतील, असेही आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत.
भरती अर्धवट : डिसेंबर २०१७ सालची पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अद्याप अर्धवट आहे. नवीन शिक्षक भरती करण्यासाठी फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घाईगडबडीत परीक्षा घेण्यात आली. निकाल लावायला महिना लागला, जून उजाडला तरी नियुक्ती दिलेली नाही.
परजिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्या निदर्शनास आणून देत असूनही तोडगा निघालेला नाही. स्थानिकांना भरतीत प्राधान्य दिल्यास ही समस्या मार्गी लागेल. - भालचंद्र दुर्गवळी