चिपळूण : दोन हजार किंवा त्यापुढे लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील ३२ गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत हे कक्ष सुरू केले जात असून, त्यासाठी जिल्हा परिषद शाळा मोठा आधार ठरल्या आहेत. तालुक्यातील १९ शाळांमध्ये हे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू होणार आहेत.
लॉकडाऊन काळातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गृह अलगीकरणात असणारे असंख्य कोरोनाबाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक शासकीय नियम पाळत नाहीत. अलगीकरणाचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच हे रूग्ण सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शासनाने गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये दोन हजार किंवा त्यापेक्षा पुढे लोकसंख्या असेल त्या गावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचांना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार अलोरे प्रकल्प दवाखान्यात, असुर्डे जिल्हा परिषद शाळा, चिंचघरी येथे न्यू इंग्लिश स्कूल, सती - चिंचघरी, धामणवणे जिल्हा परिषद शाळा, कळंबट हायस्कूल, कळंबस्ते, कापसाळ, कामथे बुद्रुक जावळेवाडी व माटेवाडी, कुंभार्ली, कुटरे हायस्कूल, कोकरे, कोंडमळा, कोळकेवाडी पायरवाडी, खडपोली वाकणवाडी, खेर्डी, वहाळ, वालोपे, मांडकी बुद्रुक, मुतर्वडे, टेरव, पिंपळी बुद्रुक, वेहेळे येथील जिल्हा परिषद शाळा, मांडकी हायस्कूल, मिरजोळी येथे नॅशनल मीडियम स्कूल व दलवाई हायस्कूल, निवळी हायस्कूल, पेढांबे येथे मंदार एज्युकेशन सोसायटी, पेढे येथे आर. सी. काळे महाविद्यालय, पोफळी येथे महाजनको करमणूक केंद्र, रामपूर येथे मिलिंद हायस्कूल, सावर्डे येथे गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय, शिरगाव हायस्कूल, वीर येथे न्यू इंग्लिश स्कूल येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारले जाणार आहेत.