रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे रोजगार व्यवसायावर परिणाम झाला. कित्येकांपुढे बेकारीचे संकट उभे राहिले. असे असतानादेखील खासगी शाळा मात्र पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. पालकांची परिस्थिती लक्षात घेता शाळांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शाळांची हुकूमशाही थांबवावी अन्यथा शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा शिरगावचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांनी दिला आहे. माजी सभापती महेश ऊर्फ बाबू म्हाप यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
मंगळवारी शहरातील काही पालकांना घेऊन संगमेश्वरी जिल्हा परिषद येथे आले होते. त्यांनी माजी सभापती बाबू म्हाप यांना हा प्रकार सांगितला. शिक्षणाधिकाऱ्यांनी यात लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वास्तविक कोरोना काळातील शुल्क माफ करणे गरजेचे होते. अनेक पालक संकटातून मार्गक्रमण करीत आहेत. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. मात्र शाळांकडून विविध कारणे सांगून फी भरण्याचे आवाहन केले जात आहे. काही शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे उपक्रम न राबवितासुद्धा शुल्क आकारण्यात येत आहे. याबाबत शाळांनी धोरण न बदलल्यास शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा संगमेश्वरी यांनी दिला आहे.