रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संसर्ग साखळी तोडण्यासाठी, रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करून मुलांना शालेयस्तरावर गुणांकन देण्याची सूचना केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत असल्याने विविध खासगी, शासकीय आस्थापना बंद आहेत. व्यवसायांवर परिणाम झाला आहे. एकूणच कोरोनामुळे सलग दोन वर्षे अर्थचक्रावर परिणाम झाला असल्याने खासगी शाळांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शिल्लक शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये, अशी मागणी पालकांमधून करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाकडून यावर्षीही परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, कडक निर्बंधामुळे शैक्षणिक व अशैक्षणिक कामकाजही तूर्तास बंद आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला पहिली ते आठवीनंतर नववी व अकरावीच्या वर्गाची परीक्षा रद्द करण्यात आल्या. अनेक शाळांचे निकाल दि. १ मे रोजी लागतात व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होते. दि. १५ जूनपासून राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होतात. मात्र यावर्षी कोरोनारूपी संकटामुळे विचित्र परिस्थिती ओढावली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व खासगी आस्थापना सध्या बंद आहेत. सध्या काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, लॉकडाऊनचे पडसाद अजून कित्येक महिने सोसावे लागणार आहेत. मात्र, काही शाळा मासिक फी भरण्याचा तगादा पालकांना लावत आहेत. गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील केवळ मासिक शैक्षणिक शुल्क वगळता अन्य शुल्क काही शाळांनी रद्द केले; मात्र काही शाळांनी पालकांकडून वसूल केले. शिवाय नवीन शैक्षणिक वर्षात शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे.
शाळांनीही सद्य:स्थितीचा विचार करून शुल्क भरण्याची सक्ती पालकांवर करू नये, शिवाय नवीन शुल्कवाढ तूर्तास तरी रद्द करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.