घरदुरूस्तीही महागली
रत्नागिरी : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी, कडधान्याचे दर भरमसाठ वाढले असतानाच सिमेंट, लोखंडाचे दरही वाढले आहेत. मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. विविध वस्तूंच्या दरवाढीमुळे घरबांधणी तसेच दुरूस्तीही महागली आहे.
रस्त्यावर माती
रत्नागिरी : शहरातील रस्ते नळपाणी, गॅस जोडणी तसेच भूमिगत विजेच्या वाहिन्यांसाठी खोदण्यात आले होते. अद्याप काम सुरू असल्याने व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. पावसामुळे सर्व माती रस्त्यावर आली आहे. रस्ते निसरडे झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
परीक्षा रद्द करण्याची मागणी
रत्नागिरी : बारावीच्या परीक्षा शासनाने ऑफलाईन घेण्याचे घोषित केले असले तरी अद्याप नवीन वेळापत्रक अथवा सूचना काहीच नाहीत. कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे शासनाकडून अद्याप निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा शासनाने आता रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.
टँकरला मागणी
रत्नागिरी : चक्रीवादळामुळे शहरातील वीजपुरवठा ठप्प आहे. रविवारपासून वीजपुरवठा गायब असल्याने गृहनिर्माण संकुलातील पाणीसाठा संपला आहे. शहराला सकाळी पाणीपुरवठा झाला असला तरी विजेअभावी पाणी चढविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे काही नागरिकांकडून छोट्या टाक्या मागविण्यात येत आहेत.