रत्नागिरी : नाचणे मार्गावरील अवैध व्यवसायातील संशयित महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी दिली.
शहरात गुरुवारी नाचणे आय.टी.आय. मार्गावरील एका इमारतीत अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. गिऱ्हाईक आणून युवतीकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. तेथे धाड टाकून पोलिसांनी पीडित युवती आणि एका पुरुषाला अटक केली होती. याप्रकरणी अटक केलेल्या रावसाहेब जगन्नाथ माळी हा त्याच्या पत्नी सोबत हा व्यवसाय करत होता. एस. टी. महामंडळातील नाेकरी सुटल्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरू केल्याची कबुली त्याने पाेलिसांना दिली हाेती.
पाेलिसांनी घटनास्थळी छापा मारल्यानंतर त्याची पत्नी पोलिसांना सापडली नव्हती. तिला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनास्थळी सापडलेली पीडित युवती रावसाहेब माळीच्या पत्नीच्या ओळखीतूनच या व्यवसायात आली होती. त्यामुळे तिला पकडणे महत्त्वाचे ठरले आहे. रत्नागिरीत सापडलेल्या पीडित युवतीबरोबरच अन्य कुठल्या मुलींना तिने या व्यवसायात आणले आहे, याची माहिती महिलेच्या अटकेनंतर स्पष्ट हाेणार आहे. या महिलेचा शाेध घेत असल्याचे शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी सांगितले.