रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले तरी ही भरती कंत्राटी पद्धतीचीच असल्याने त्याच्या प्रतिसादाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी भरतीऐवजी कायम भरती करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
गतवर्षी मार्चपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. मात्र, पुढे त्याचे स्वरूप इतके मोठे होईल, याचा अंदाज कोणत्याही यंत्रणेला नव्हता. ऑगस्टपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले. गणेशोत्सव काळात झालेला फैलाव अधिक होता, असे चित्र तेव्हा निर्माण झाले होते. सप्टेंबरमध्ये त्याचे प्रमाण अगदीच टोकावर होते. मात्र, नंतर ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या घटू लागली. लोकांना दिलासा मिळाला. अगदी मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत हा दिलासा कायम होता. मात्र, त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली.
सध्या रोज विक्रमी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण खूप वाढत आहे. त्यातच आधीपासून आरोग्य क्षेत्रात अनेक पदे रिक्त आहेत. गतवेळी कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सरकारने कंत्राटी भरती करण्याला मान्यता दिली होती. रत्नागिरी जिल्ह्यात त्यावेळी सुमारे ८०० कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करीत होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर त्यांची सेवा संपली. आता पुन्हा रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सहा फिजिशियन, ३७ भूलतज्ज्ञ, २ मायक्रोबायोलॉजिस्ट, १५ एमबीबीएस डॉक्टर्स, १२ आयुष वैद्यकीय अधिकारी, १६ लॅब टेक्निशियन आणि १०० परिचारिका घेतल्या जाणार आहेत.
याआधी गतवर्षी घेतलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम केले जावे, अशी मागणी बराच काळ केली जात होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. या कंत्राटी डॉक्टर्स किंवा कर्मचाऱ्यांना पुढील काळातील नोकरीची हमी नसल्याने दोन-तीन महिन्यांसाठी काम स्वीकारण्याची मानसिकता कमी आहे. जे सेवेत आहेत, त्यांना नोकरीची, अन्य संरक्षणांची हमी आहे. ती हंगामी कर्मचाऱ्यांना नाही, असाही आक्षेप घेतला जात आहे.
वेतनात वाढ
कंत्राटी कामासाठी डॉक्टर्सना आधी दिल्या जाणाऱ्या वेतनात २० हजार रुपयांची वाढ देण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आधीच केली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी तत्काळ प्रतिसादाची अपेक्षा केली जात आहे.
रिक्त पदांसाठी हा पर्याय नाही
मुळात आरोग्य यंत्रणेत असंख्य पदे रिक्त आहेत. कोरोनाची साथ जरी संपली तरी नियमित आरोग्य सेवा देण्यासाठीच सध्याची पदे अपुरी आहेत. त्यामुळे सरकारने हंगामी कर्मचारी न घेता कायमस्वरूपी कर्मचारी घ्यावेत, अशी अपेक्षा कामाचा खूप ताण पडत असलेले कर्मचारीही करत आहेत.
फिजिशियन ६
भूलतज्ज्ञ ३७
मायक्रोबायोलॉजिस्ट २
एमबीबीएस डॉक्टर्स १५
आयुष वैद्यकीय अधिकारी १२
लॅब टेक्निशियन १६
परिचारिका १००