आज २२ जानेवारी ! आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर खुले होत आहे. भारतभर हा सोहळा विविध उपक्रमांनी साजरा हाेत आहे. या रामकार्यात आजच्या लेखाद्वारे माझा खारीचा वाटा उचलतो आहे.- श्रीवल्लभ माधव साठे, रत्नागिरी.गेल्या आठवड्यात लेखमालिकेच्या निमित्ताने भ्रमंती करताना स्थानिक मित्राशी गप्पा मारताना अचानक एका राम मंदिराचा उल्लेख झाला. लगोलग त्याच्या दर्शनानेच भ्रमंतीची सुरुवात केली. ‘तारीख-भटकंती आणि श्रीराम’ हे त्रिवेणी योग जुळतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, कधीकधी विचारांच्या पल्याड काहीतरी जुळत असते, हे खरे!
मूळ मंदिर खासगी असून, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. भागवत कुटुंबीयांचा असा हा रामराया ! मंदिरातील श्रीराम-लक्ष्मण-सीता आणि मारुतीरायाच्या मूळ मूर्ती शिवकालात प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींकडून भागवत कुटुंबीयांना मिळाल्या. त्यांनी मोठ्या श्रद्धेने गावात त्यांची प्रतिष्ठापना केली. हे भागवत कुटुंबीय त्याकाळी देसाई खोतांकडे नोकरी करत होते. मात्र, पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर कोकणात मुघलांची आक्रमणे वाढली. या आक्रमण काळात गावातील अनेक पुरुष मारले गेले. तेव्हा घरात शिल्लक स्त्रिया व मुला-बाळांनी गावातच स्थलांतर केले. स्थलांतराच्या वेळी मारुतीरायाची मूर्ती हलवणे शक्य न झाल्याने ती मूळस्थानीच ठेवून इतर मूर्तींची पुनर्स्थापना करण्यात आली. पुनर्स्थापनेवेळी जुजबी रचना करून मंदिर उभे केले. पुढे वेळोवेळी दुरुस्ती करून अलीकडेच आधुनिक पद्धतीचे छोटेखानी मंदिर उभे केलेले आहे.आश्चर्य असे की, येथील श्रीरामाची मूर्ती बैठी आहे. दोन्ही हात मांडीवर योगमुद्रेत असून, धनुष्यबाण पाठीवर अडकवलेले आहेत. श्रीराम बैठे असताना सीता आणि लक्ष्मण मात्र उभे दिसतात. काळ्या पाषाणातील या तिन्ही मूर्ती कदाचित वेगवेगळ्या कालखंडात घडवलेल्या असाव्यात, असा अंदाज येतो. शेजारी लहानसा गणपती प्रतिष्ठित आहे. येथील नवीन मारुतीराया हात जोडलेला आणि संपूर्ण चेहरा दिसणारा आहे. या सर्व मूर्तींना सामावणारा चार खांबांवर तोललेला मंडप आहे आणि मंडपाबाहेर हॉलवजा मंदिर बांधलेले आहे.
मुळात ‘श्रीराम’ शब्दाचे नैसर्गिक आकर्षण आपल्याला इकडे घेऊन जाते आणि त्याचे होणारे कल्पनातीत दर्शन एक निराळेच सुख पदरात टाकून जाते. मंदिराची मालकी वंशपरंपरागतपणे सांभाळणाऱ्या भागवत कुटुंबीयांच्या सोबत होणाऱ्या गप्पांनी या सुखाला निराळीच झळाळीही लाभते. अशा या रामरायाचे दर्शन घेतलेच पाहिजे!सीतावर रामचंद्र की जय !!
थाेडीसी वाट वाकडी केली की..पर्यटनाच्या दृष्टीने या मंदिराकडे पाहणे किंचित कठीण असले तरीही, वाट वाकडी केलीच तर एक सुखद अनुभव निश्चित मिळू शकतो. अशा या अकल्पित रामरायाचे दर्शन होते, संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड या गावी ! आरवली - माखजन रस्त्यावर बुरंबाडमधील विष्णूवाडी लागते. याच वाडीत श्रीराम मांडी घालून आसनस्थ आहे. मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवरच एका बाजूने खचलेली पण आजही वापरात असलेली पायऱ्यांची विहीर आहे. तसेच वाडीतच असलेले विष्णू मंदिरही भेट देण्याजोगे आहे.