शिवाजी गाेरे
दापोली : समुद्रापासून सुमारे अडीचशे फूट उंचीवर असलेले दापाेली कोकणचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले दापोली सलग दुसऱ्या दिवशीही गारठली असून, पारा ९.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने ही माहिती दिली.दापोलीत रविवारी अचानक जोरदार पाऊस पडला आणि त्यानंतर थंडीची लाट उसळली आहे. दापोलीचा पारा घसरल्याने दापाेलीकरांना हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागाबराेबरच शहरी भागातही शेकाेट्या पेटू लागल्या आहेत. गेले काही दिवस दापोलीत आल्हाददायक थंडी पसरली होती. परंतु, अचानक गारठा सुरु झाल्याने दापाेलीकरांना हुडहुडी भरली आहे.हवामान विभागाने राज्यामध्ये गारपीट व जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यापूर्वीच दापोली तालुक्यामध्ये थंडीची लाट आल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. पुढील काही दिवस दापोली तालुक्यात थंडीचा कडाका अजून वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.