आॅनलाईन लोकमतदापोली(जि. रत्नागिरी), दि. १९ : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल, टाळसुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांनी तयार केलेल्या ‘अनोखे ज्ञान’ या प्रतिकृतीने महाराष्ट्रात दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रम एन. सी. इ. आर. टी. नवी दिल्ली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, लोकसंख्या शिक्षण कक्ष, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर, व्यंकटेश्वर शिक्षण संस्था वाळवा, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ४२व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाळसुरे विद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनता थांबवा, पाण्याचे योग्य नियोजन, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, ओझोन थराचे संरक्षण, वृक्षतोड थांबवा, अशा ज्वलंत विषयांवर जनजागृती करणारी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. दापोली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम, रत्नागिरी जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोकसंख्या शिक्षण विभागात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान न्यू इंग्लिश स्कूल, टाळसुरे विद्यालयाला मिळाला होता. तालुकास्तरावर सलग नऊ वर्षे जिल्हास्तरावर चार वर्षे यश संपादन करणाऱ्या टाळसुरे विद्यालयाने राज्यस्तरावर यश मिळवल्याने विद्यालयाच्या शीरपेचात मानाचा खोवला गेला आहे. विद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल जागतिक पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते मुख्याध्यापक संदेश राऊत यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र विद्याप्राधिकरण उपसंचालिका डॉ. अचला जडे, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, व्यंकटेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, शिक्षण उपसंचालक मारूती गोंधळी, प्रा. महेश जोशी, भगवान साळुंखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टाळसुरे विद्यालयाचे ‘अनोखे ज्ञान’ राज्यात दुसरे
By admin | Published: April 19, 2017 12:54 PM