आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. १५ : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीमधील सचिवांचा राजीनामा घेणे, हे पूर्वनियोजित कारस्थान आहे. संचालक मंडळाला मनमानीपणे कारभार करण्यात अडथळा ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना दबावतंत्र वापरून त्रास देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष प्रकाश काजवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.दोन वर्षांपासून पतपेढीच्या सचिवांविरुध्द काहींनी कारस्थाने रचली होती. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सचिव प्रसाद खडवे यांचा राजीनामा घेतला, असा थेट आरोप माजी अध्यक्ष काजवे यांनी संचालक मंडळावर केला आहे. पतपेढीची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली होती. दोन पॅनेलकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. यापूर्वी कधी झाली नव्हती, अशी चुरसपूर्ण लढत यावेळी झाली होती. तत्कालिन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करीत शिक्षकांच्या काही संघटनांनी महायुती करून १५पैकी १३ जागा जिंकून अनेक वर्षांची असलेली सत्ता उलथवून टाकली होती. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सुडाचे राजकारण सुरु केले आहे. त्यातूनच त्यांनी सचिवांचा राजीनामा घेतला आहे, असा आरोप माजी अध्यक्ष काजवे यांनी केला आहे. सर्वसाधारणपणे किमान तीन वर्षे एकाच ठिकाणी काम केल्यानंतर कर्मचाऱ्याची बदली करणे, असा नियम असताना तो डावलून प्रशासकीय बदलीच्या नावाखाली सचिव प्रसाद खडवे यांचा बळी दिला आहे, असे काजवे यांचे म्हणणे आहे. आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना त्या जागेवर काम करण्याची संधी मिळावी, यासाठीच केलेला हा खटाटोप झाला असून, या मनमानी कारभाराविरूध्द जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सचिवांचा राजीनामा हा पूर्वनियोजित कट : प्रकाश काजवे
By admin | Published: July 15, 2017 3:24 PM