रत्नागिरी : काेकण रेल्वेची सुरक्षा व उपाययाेजनेबाबत काेकण रेल्वे मार्गावर संयुक्तपणे माॅक ड्रिल घ्यावे, अशी सूचना काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केली. पाेलिस अधीक्षक कार्यालयात आयाेजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी काेकण रेल्वेच्या सुरक्षा आणि उपाययाेजनेबाबत माहिती घेतली.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्याचा दाैरा केला. या दाैऱ्यात त्यांनी सर्व अभिलेख, सर्व प्रकारचे रजिस्टर, मुद्देमाल, शस्त्रागार, प्रलंबित अर्ज यांचा आढावा घेतला. तसेच पोलिस अंमलदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार भरविण्यात आला. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्था, आगामी निवडणूक, पोलिस खात्याची शिस्त व गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले.
कोकण रेल्वेची सुरक्षा व उपाययोजना याबाबत घेतेल्या आढावा बैठकीला रेल्वेचे महानिरीक्षक अंजनीकुमार सिन्हा, मडगाव येथील आर. पी. एफ.चे प्रादेशक सुरक्षा आयुक्त फ्रान्सिस लोबो, रायगडचे पाेलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, सिंधुदुर्गचे पाेलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरीच्या अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अशोक धोत्रे (ए.एस.सी-आर.पी.एफ, रत्नागिरी), रेल्वे पोलिस निरीक्षक मधाळे, रेल्वे पोलिस निरीक्षक संतोष बर्वे, आरपीएफ चिपळूणचे पाटील, राजेश जोशी, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई उपस्थित होते. या बैठकीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या सर्व पोलिस स्थानकांचे प्रभारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित हाेते.
या बैठकीत आरपीएफ आणि पोलिसांची भूमिका व समन्वय, मानवनिर्मित आपत्ती ओळखणे, रेल्वे मालमत्तेचे नुकसान रोखणे, रेल्वे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, रेल्वे क्रॉसिंगवर योग्य नजर ठेवणे, योग्य बळाचा वापर करून गस्त करणे यावर चर्चा करण्यात आली. काेकण रेल्वे मार्गावर पाेलिस आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त माॅक ड्रिल घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.