कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात?
हे शीर्षकगीत असलेल्या मालिकेला आता अनेक वर्षे झाली असली तरीही हे शीर्षकगीत अजूनही मनाला भुरळ घालतं - ते त्याच्या गोडव्यामुळे आणि त्यातील भावार्थामुळे. म्हणूनच हे गीत अजृूनही मनात रुंजी घालून आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेली ‘गोट्या’ ही मराठी मालिका लोकप्रिय झाली होती. केवळ लहानच नव्हे, तर अगदी मोठ्यांनाही ही मालिका पाहताना भान विसरायला लावत होती. यातील प्रमुख भूमिका असलेल्या गोट्या म्हणजे जाॅय घाणेकर या मुलाचा यात अभिनय मनाला सातत्याने भावणारा होता. त्याचबरोबर त्याची लहान बहीण असलेली सुमा हिच्यासह सर्व बालकलाकारांचे अभिनय त्या मालिकेला साजेसे असेच होते. या मालिकेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, साखरपा या ठिकाणांचे संदर्भ अधूनमधून येत असल्याने ही मालिका पाहताना अधिक जवळची वाटत होती, हे सांगायलाच नको. अशी ही मालिका सध्या तरी काळाच्या पडद्याआड गेली होती. सध्या सर्वच वाहिन्यांवर मालिकांचे पेवच जणू फुटले आहे. सध्या सुरू असलेल्या अनेक मालिका दर दिवशी आवर्जून बघितल्या जातात. महिलांच्याच नव्हे तर अगदी पुरुषमंडळीही कार्यालये, मित्रपरिवारांमध्ये या मालिकांच्या, त्यातील पात्रांच्या उत्साहाने चर्चा करताना दिसतात. ती मालिका संपली की, मग काही महिन्यातच ती मालिका ‘आऊट डेटेड’ होते. तसं पाहिलं तर आताच्या बहुतांशी मालिकांचा ढाचा तोच असतो. त्यामुळे कुठल्या मालिकेचे कथानक काय होते, हे आठवणे अवघड.
तर, गोट्या या मालिकेची आठवण येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ही मालिका यूट्युबवर दिसली. या मालिकेत छोटेखानी भूमिका असलेल्या आणि कोकणच्या सुकन्या असलेल्या, मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या या गोट्या मालिकेचे सर्व भाग एकत्र करून ते यूट्युबवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना ही मालिका आवडत होती, त्यांना आता पुन्हा ही मालिका यावर उपलब्ध झाली आहे.
जुन्या काळातही विज्ञान आणि संस्कार यांची उत्तम सांगड या मालिकेत पाहायला मिळते. मुलांना घडविताना ‘मना घडवी संस्कार’ याचे भान ठेवून मुलांच्या मनावर कसे संस्कार करावेत, हे या मालिकेतून उत्तमरीत्या दाखविले होते. ‘गोट्या’ मालिका पाहताना गोट्याच्या भाबडेपणामुळे कधी मनसोक्त हसायला येते, तर कधी डोळ्यांच्या कडाही पाणावतात. जुन्या काळचे ग्रामीण जीवन पाहताना मन गुुंगून जाते.
सध्या बदललेली जीवनशैली पाहताना गोट्या बाळबोध वळणाचा वाटतो. गोट्या काय किंवा त्याची लहान बहीण सुमा काय, त्यांच्या तोंडी घालण्यात आलेली वाक्ये आताच्या काळालाही अंतर्मुख व्हायला लावतात. एखाद्या घटनेची मीमांसा करताना ती वैज्ञानिक निकषावर ही मुले तपासू पाहतात. त्यांचा बालबुद्धीतील चाैकसपणाही मोठ्यांना निरुत्तर करतो, हे या मालिकेत दिसते. म्हणूनच ज्या पालकांना आपल्या मुलांच्या मनावर खऱ्या अर्थाने सुसंस्कारित करायचे आहे, त्यांनी ही मालिका आपल्या मुलांना दाखवतानाच स्वत:ही पाहायला हवी, अशीच होती.
सध्या सुरू असलेल्या मालिकांमधून कुठले संस्कार होतायत, हे शोधणे म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. या मालिकांनी स्वत:ची वेगळीच संस्कृती दाखवायला सुरुवात केलीय, ती मुलांसाठीही हानिकारक आहे, हे माहीत असूनही घरातील ज्येष्ठ मंडळी त्यात रमतात, हे दुर्दैव!