चिपळूण : येथील जागरूक नागरिक मंचातर्फे कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सोमवारी आंब्याच्या बाट्या व अन्य वृक्षांच्या बीजांचे रोपण करण्यात आले. या रुग्णालयाच्या अवतीभवती वृक्ष फारच कमी असल्याने ही मोहीम राबविण्यात आली.
सध्या या रुग्णालय परिसरात मोजकीच झाडे आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत आंब्याच्या बाट्या किंवा अन्य रोपांची लागवड केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, या उद्देशाने जागरूक नागरिक मंचाचे तानू आंबेकर, श्रीधर पालशेतकर व अन्य सहकाऱ्यांनी आंब्याच्या बाट्या व अन्य बीज जागोजागी खोवल्या.
याविषयी आंबेकर यांनी सांगितले की, मान्सून सुरू असल्याने प्रत्येकाने किमान आंब्याच्या बाट्या किंवा अन्य बीज जमिनीत खोवण्याचे काम करावे. नक्कीच त्यातून चांगला परिणाम दिसून येईल. अनेक वर्षात कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षलागवड केलेली नाही. त्याविषयी रुग्णालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही किंवा कोणाचेही लक्ष नाही. आज कोरोनाच्या परिस्थितीत ऑक्सिजनचे महत्त्व आणखी गंभीरतेने जाणवू लागले आहे. एका वृक्षाची किंमत ७४ हजार ६०० रुपये इतकी असून ते सिद्ध झाले आहे. तेव्हा प्रत्येकाने वृक्षलागवड करण्यासाठी व वृक्षतोड थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
------------------------------
चिपळुणातील जागरूक नागरिक मंचातर्फे कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आंब्याच्या बाट्या खोवण्यात आल्या.