आवाशी : राज्या-राज्यांमध्ये एकीकडे सीमा, पाण्यावरून मोठमोठे वाद होत आहेत. मात्र, आवाशी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने सीमांपलिकडेही माणूसकी कशी असते, याचे चित्रण घडले आहे. अपघातातील मृत व्यक्तीची दशा पाहून एकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू आला. या दुर्दैवी घटनेने सारेच हळहळले.खेड तालुक्यातील आवाशी येथे ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. ट्रक (जीजे - २४ यु ११८९) गोव्याहून इलेक्ट्रिक केबलचे बंडल घेऊन राजस्थानकडे चालला होता, तर दाभीळ खेड येथून दिवसभराच्या कामासाठी ट्रॅक्टर गुणदे येथे चालला होता. सकाळी १० वाजण्याची वेळ होती.गोव्याहून आलेल्या ट्रकवर दोन चालक होते, तर ट्रॅक्टरमध्ये चालकासह अन्य दोनजण बसले होते. पैकी एकजण ट्रॉलीमध्ये होता. ट्रॅक्टर (एमएच - ०८ - जी - ९३०८) शिवकुमार पवार (२५) चालवत होता, तर अपघातग्रस्त ट्रक साबीर मोहम्मद (२९, राजस्थान) हा चालवत होता.आवाशी - गुणदे फाट्यालगत ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला आणि तो समोरील ट्रॅक्टरवर जोरात धडकला. अपघातप्रसंगी ट्रॅक्टरमधील महेश पवार (१७) गंभीर जखमी झाला, तर ट्रकचे दोघेही चालक ट्रकमध्येच अडकून पडले. परिसरातील स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवून दिले. ट्रॅक्टरमधील महेश याच्यावर चिपळूण येथे उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.ट्रकमधील दोघेही आजवर कराड येथे उपचार घेत आहेत. नशीब बलवत्तर म्हणून ट्रॅक्टरमधील इतर दोघे किरकोळ इजा होण्यावर निभावले. मात्र, हे सगळे होत असतानाच ट्रकचे मालक व चालकाचे वडील हे राजस्थानहून आपल्या एकमेव गाडीचा अपघात कसा घडला, याची पाहणी करण्यासाठी १९ रोजी आवाशी येथे आले. अपघाताची पाहणी केल्यानंतर त्यांना असह्य वाटू लागले. मात्र, याचवेळी लोटे पोलीस दूरक्षेत्रात पोलिसांच्या तपासकामी त्यांना मदत करण्यासाठी ते त्यादिवशी सायंकाळी उशिराने गेले.यावेळी येथीलच एक ट्रान्सपोर्ट चालक जो राजस्थानी आहे तो त्यांच्याबरोबर होता. पोलिसांचे काम आटोपून ते इसाक नूर महम्मद खान (५१, बारमेर, राजस्थान) याच्या रूमवर गेले. रात्रीचे जेवण आटोपून तेथे झोपी गेले. सकाळी उठल्यावर त्यांना आपल्या एकमेव गाडीच्या अपघाताची आठवण असह्य झाली आणि त्यांच्या छातीत जोराची कळ आली. सहकाऱ्यांनी उपचारासाठी त्यांना जवळच्या परशुराम रुग्णालयात नेले. मात्र, तेथे पोहोचण्याआधी त्यांना पुन्हा एक जोराचा झटका आला आणि त्यांनी गाडीतच प्राण सोडला.मुंबई - गोवा महामार्गावर दररोज अपघात होत असतात. परंतु, काही अपघाताच्या घटना जे अपेक्षित नसते, तेच कसे घडते, याची उदाहरणे देऊन जातात, त्यापैकीच हे एक उदाहरण होय. योगायोग किती विचित्र बघा! अपघात घडला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात, अपघातात मृत झाला तो १७ वर्षीय तरुण विजापूर म्हणजे कर्नाटक राज्यातील आणि अपघाताचा धक्का सहन न होता ज्याला जीव गमवावा लागला तो ५१ वर्षीय वृद्ध बारमेर म्हणजे राजस्थान राज्याचा! खेडनजीक आवाशी येथे झाला होता ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात.ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरवर जाऊन आदळला.अपघातस्थळी ट्रान्स्पोर्टचा चालकही होता समोर.अपघाताच्या आठवणीनेच त्यांना आला झटका.रुग्णालयात नेत असताना गाडीतच आला मृत्यू.
अपघाताची गंभीरता पाहूनच त्याने मृत्यूला कवटाळले
By admin | Published: April 28, 2016 8:48 PM