लांजा : ‘नागीण’ मालिकेतील मुलीने गळफास लावल्याचे दृश्य पाहून ७ वर्षीय चिमुकलीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आर्या राजेश चव्हाण असे तिचे नाव असून, ही घटना कोर्ले सहकारवाडी (ता. लांजा) येथे शनिवारी (वय ११ जून) सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.राजेश सुभाष चव्हाण (३८) यांची ती मुलगी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीला दोन मुली असून, त्या आईसोबत फलटण येथे राहतात, तर दुसरी पत्नी माहेरी गेली आहे. सुट्टीमुळे या दोघींना कोर्ले येथे आणले होते. या दोघींना नागीण मालिका आवडते. या मालिकेतील एका दृश्यात लहान मुलीचा गळफास लावून मृत्यू झाल्याचे पाहून आर्याने 'खरंच गळफास लावून असे मरतात काय?' असे मोठी बहीण प्रिया हिला विचारले होते. त्यावेळी तिने हो, असे सांगितले.त्यानंतर प्रिया बाजूलाच राहणाऱ्या आपल्या आजीकडे गेली होती. तेथीलच एक महिला आर्याला हाक मारतं घरामध्ये गेल्या. घरात येताच. खोलीतील भिंतीच्या खिळ्याला साडीच्या काठाचा दोरीसारखा वापर करून एक टोक खिळ्याला बांधून दुसऱ्या टोकाचा फास तयार करून आर्याने गळ्यात टाकल्याचे त्यांनी पाहिले. हे पाहून त्या महिलेने आजीला व तिच्या मोठ्या बहिणीला आवाज दिला. त्या महिलेनेच आर्याला खाली उतरवले.
राजेश यांचा भाऊ सूरज याला हा प्रकार कळताच त्याने मोबाईलवरून राजेश यांना माहिती दिली. त्यानंतर आर्याला कोर्ले फाटा व लांजा येथील खासगी डॉक्टरांना दाखविण्यात आले. तेथून तिला लांजा ग्रामीण रुग्णालयात आणले असता तपासून मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, हेडकॉन्स्टेबल भालचंद्र रेवणे, अरविंद कांबळे, महिला पोलीस प्रमिला गुरव, आयकाँपचे भोसले, जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील करीत आहेत.
...तर वाचली असतीराजेश चव्हाण हे सायंकाळी कोर्ले फाटा येथे निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जाण्याचा आर्याने हट्ट धरला होता. मात्र, काळोख पडल्याने तिची समजूत काढली. त्यानंतर ती घरीच थांबली होती. ती त्यांच्याबरोबर गेली असती तर ही दुर्दैवी घटना टळलीही असती.
मृतदेह आईच्या ताब्यात
- जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह फलटण येथील आईच्या ताब्यात देण्यात आला..
- या घटनेनंतर श्वानपथक व 'फॉरेन्सिक लॅबचे पथक तपासणीसाठी दाखल झाले होते.