चिपळूण : तालुक्यातील कामथे ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अक्षता अजित कासार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच विजय माटे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. प्रदीप उदेग यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर कासार यांची निवड झाली आहे.
स्वागत यात्रा रद्द
रत्नागिरी : गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत यात्रा शहरात व परिसरात काढण्यात येते. मात्र गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे स्वागत यात्रा रद्द करण्यात येत आहे. गतवर्षी स्वागत यात्रा न काढता हिंदू बांधवांनी भगवा ध्वज फडकवला होता. मात्र पुढच्यावर्षी मोठ्या स्वरूपात स्वागत यात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला.
गवा रेड्यांचा उपद्रव
राजापूर : तालुक्यातील पाचल, पांगरी परिसरात गवा रेड्यांचा उपद्रव वाढला आहे. कळपाने गवारेडे बागायतीमध्ये शिरून नुकसान करत आहेत. काजू, आंबा कलमे तसेच भाजीपाला, कलिंगड पिकात घुसून पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
आगाराचे नुकसान
दापोली : वीकेंड लाॅकडाऊन दोन दिवस घोषित करण्यात आला होता. वीकेंड लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन केले. प्रवासी भारमानाअभावी दापोली एस.टी. आगाराचे १४ लाखांचे नुकसान झाले आहे. पुन्हा जर लाॅकडाऊन घोषित करण्यात आला, तर हे नुकसान वाढण्याची भीती आहे.
झेंडूचा खप
चिपळूण : गुढीपाडव्यामुळे झेंडू फुलांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. स्थानिक तसेच परजिल्ह्यातील अनेक विक्रेत्यांनी शहरातील नाक्या-नाक्यावर ठाण मांडले होते. १०० ते १२० रुपये किलो दराने झेंडू विक्री करण्यात आली. कोरोनाचे सणावर सावट असतानाही झेंडूची विक्री चांगल्या प्रमाणात झाली.
रक्तदान शिबिर
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अनिकेत ओव्हाळा स्मृती समिती, जिज्ञासातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी चिपळूण, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते १ या वेळेत शिबिर होणार आहे. चिपळुणात विवेकानंद सभागृहात व रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये शिबिर होणार आहे.
साप्ताहिक रेल्वेस प्रारंभ
खेड : कोकण रेल्वे मार्गावर दि. १३ एप्रिलपासून भावनगर-कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल गाडीचा शुभारंभ झाला. २३ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित आहे. ती दि. ८ जूनपर्यंत धावणार आहे. मंगळवारी सकाळी १०.०५ वाजता ती भावनगर येथून सुटली असून तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता कोच्युवेलीला पोहोचणार हेआ. पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबणार आहे.