आयडियलच्या उपक्रमाचे काैतुक
आरवली : समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत व कोरोना काळात निर्माण होणारी रक्ताची गरज ओळखून आयडियल ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन हे समाजासाठी काैतुकास्पद असल्याचे उद्गार पंचायत समिती प्रभारी सभापती प्रेरणा कानाल यांनी काढले.
पशुसंवर्धन प्रशिक्षण
राजापूर : तालुका पंचायत समिती व रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा पाचल क्रमांक १ येथे दि. १७ ते १९ मार्च अखेर पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० विशेष घटक योजनेंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहे.
खाद्य प्रशिक्षण
राजापूर : तालुक्यातील जैतापूर ग्रामपंचायत व अंकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी खाद्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसीय प्रशिक्षणात फरसाण, बुंदी लाडू, विविध प्रकारचे मसाले आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. सरपंच रेखा कोंडेकर, उपसरपंच श्रुती मांजरेकर, सदस्या निरजा मांजरेकर मुख्याध्यापिका राजश्री नारे आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन
खेड : येथील खेड जेसीजतर्फे दि.२१ मार्च रोजी भरणे येथील एसएमएस हाॅस्पिटलमध्ये सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याचे जेसीजचे सचिव उमेश खेडेकर यांनी सांगितले. इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे सध्या रक्ताची आवश्यकता आहे.
दापोली काँग्रेसची सभा
दापोली : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक प्रभागामध्ये मोर्चेबांधणी करण्याचे आदेश देण्यात आले. या सभेत पक्षवाढीसाठी चर्चा करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.विजय भोसले, उपाध्यक्ष अशोक जाधव, तालुकाध्यक्ष अनंत मोहिते, शहराध्यक्ष सिराज रखांगे आदी उपस्थित होते.
पगारवाढीची मागणी
देवरुख : अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांमध्ये अन्न शिजविण्यासाठी ज्या महिला काम करतात, त्यांना कित्येक वर्षे पगारवाढ झालेली नाही. याबाबत जिल्हा परिषद सदस्या रचना महाडिक व सेनेच्या महिला विभाग उपसंघटक पूनम देसाई यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचेकडे मागणी करण्यात आली आहे.
श्रमदानातून वनराई बंधारे
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझर येथील स्मशानभूमी येथे समलिंगी नदीवर ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला. यावेळी सरंपच राजू जाधव जिल्हा परिषद सदस्या मुग्धा जागुष्टे, उपसरपंच मैथिली मांगले, ग्रामविकास अधिकारी रवींद्र लोटणकर, पोलीस पाटील अनुराधा डोंगरे आदी उपस्थित होते.
प्रियांका देसाई यांचा सत्कार
आरवली : पाटगाव केंद्र शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रियांका देसाई या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. देसाई यांनी काटवली, मुरादपूर, निवे, पाटगाव येथे सेवा बजावली. सेवानिवृत्त शिक्षण नंदकुमार देसाई यांचेही सहकार्य लाभले.
कुणबी कर्मचारी सेवा संघाची सभा
रत्नागिरी : कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी या सामाजिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते कै.शामराव पेजे सभागृह, कुणबी भवन येथे मंगळवार दि.२३ मार्च रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमावलीचे पालन करून सभेचे नियोजन केले आहे.