राजापूर : तालुक्यातील ससाळे, हसोळ, पांगरे परिसरात वणवा लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यामध्ये लागणाऱ्या वणव्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी तालुक्यात अशा घटना घडत असतात. या वणव्यांमध्ये अनेक बागा भस्मसात होऊन बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
संस्कृतीबाबत जनजागृती
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथे मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये मातृभाषेचा प्रसार, प्रचार व्हावा तसेच अनेक लिखित बोली भाषा, संस्कृती, परंपरा याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी झूम मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात आले. यात विविध भाषिक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेची माहिती दली.
मदतनिसांचा सन्मान
देवरुख : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ग्रामपंचायतीतर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अंगणवाडी मदतनिस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कार्यक्रम पुढे ढकलला होता.
मोफत नेत्रतपासणी
शिरगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि नॅब आय हॉस्पिटल चिपळूण यांच्यावतीने शिरगाव येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ६६ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या १६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया दि. १८ रोजी होणार आहे.
उपकेंद्राचे भूमिपूजन
खेड : तालुक्यातील बहिरवली आरोग्य उपकेंंद्राचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या नफिसा हशमत परकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हशमत परकार, प्रकाश मोरे, बांधकाम उपअभियंता चव्हाण, आदी उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्र उभारले जाणार असल्याने परिसरातील सामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
फळांची काळजी घ्यावी
दापोली : गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. हे वातावरण आंब्याला घातक असल्याने फळाची गळ होण्याचा धोका बागायतदारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे बागायतदारांनी फळाची काळजी घेण्याचे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाने केले काहे.
खोपडकर यांची निवड
सावर्डे : लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी चंद्रकांत खोपडकर यांची निवड करण्यात आली आहे. खोपडकर यांनी याआधी चिपळूण तालुक्याचे उपाध्यक्षपद तसेच कोकण विभागाचे अध्यक्षपदही चांगल्या तऱ्हेने सांभाळले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांची ही निवड झाली आहे.
स्वच्छता अभियान
रत्नागिरी : सागरी किनाऱ्यावर पुन्हा स्वच्छता अभियान राबविले जात आहे. प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, व्यवस्थापन यावर परिणामकारक कृती करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली आहे. या मोहिमेत जनतेनेही सहभाग दर्शवावा, असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे.
शाहीर रसाळ यांचा सत्कार
गुहागर : तालुक्यातील वरवेली, तेलीवाडी येथील तरुण उत्साही मंडळाच्या वतीने काशीविश्वेश्वर मंदिराच्या द्वितीय वर्धापनदिनाचे औचित्य साधून भजनीबुवा सूर्यकांत रसाळ यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष दशरथ किर्वे यांच्या हस्ते रसाळ यांना गौरविण्यात आले.
डांबरीकरण पूर्ण
पावस : गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावखडी, पावस या सागरी महामार्गाचे नूतनीकरण, डांबरीकरण पूर्ण झाले आहे. या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पहिल्याच पावसात या रस्त्यावरील डांबर उडून गेल्याने खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. अपघात वाढले होते. मात्र, आता या सागरी महामार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे.
Selection of KhopadkarSelection of Khopadkar