चिपळूण : राज्याच्या कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती निर्माण करण्यात आली आहे. या समितीत राज्यातील केवळ तीन आमदारांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यात आमदार शेखर निकम यांचा समावेश आहे.
राज्याच्या कृषीधोरण निश्चितीसाठी ही समिती तयार करण्यात आली आहे. आमदार निकम यांच्यासह परभणी येथील डॉ. राहुल पाटील, चंद्रपूर येथील आमदार प्रतिभा धानोरकर या तीन आमदारांचा समितीत समावेश आहे. कोकणातून आमदार शेखर निकम यांना संधी देण्यात आली आहे. आमदार निकम यांनी कृषीशिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी मिळवली आहे. कृषी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रत्यक्ष लागवड आणि कृषी शिक्षण या दोन्हीबाबत त्यांच्याकडे विशेष अनुभव आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव बा. की. रासकर यांनी या निवडीचे पत्र निकम यांना दिले आहे. आमदार निकम यांना संधी मिळाल्याने कृषी शिक्षणात कोकणच्या विविध कृषीविषयक महत्त्वाच्या बाबींचा समावेश होण्यास मदत होणार आहे.