रत्नागिरी : रत्नकन्या आर्या मयेकर हिची निवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या झोनल लेव्हल सेंट्रल रेल्वे शिवाजी पार्क संघामध्ये निवड झाली आहे. आर्या ही रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील असून तिची दहावी पर्यंतचे शिक्षण सेक्रेट हार्ट काॅन्व्हेंट स्कूल उद्यमनगर येथे झाले.दहावीनंतर तिने मुंबईतील रिजवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिला शालेयस्तरापासूनच क्रिकेट खेळाची आवड असल्याने वडिल शरद मयेकर यांनी तिला रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट ऍकॅडमीमध्ये दाखल केले. दिपक देसाई आणि वृंदावन पवार यांच्याकडे तिने प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर मुंबईतील वांद्रे येथील स्पोर्ट फिल्ड क्रिकेट क्लब वांद्रे पश्चिमचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांच्याकडे काही दिवस प्रशिक्षण घेतले. गतवर्षी तिची झोनल लेव्हलसाठी निवड झाली होती, परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमाणपत्र नसल्याने संधी हुकली होती. त्यासाठी तिने रत्नागिरी सोडून थेट मुंबई गाठली. मुंबईतील रिजवी कॉलेजमध्ये शिकत असताना कामत क्रिकेट क्लब शिवाजी पार्क दादर मुंबईचे प्रशिक्षक विवेक उर्फ नाना तोडणकर यांच्याकडे सराव सुरू केला. झोनल लेव्हलसाठी निवड करण्यात आलेल्या संघाच्या प्रशिक्षक प्राजक्ता शिरवडकर या असून इंडियन रेल्वेच्या प्रशिक्षक आणि खेळाडूही आहेत. आर्याच्या निवडीबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
रत्नागिरीतील आर्या मयेकरची सेंट्रल रेल्वे शिवाजी पार्क संघात निवड
By मेहरून नाकाडे | Published: April 17, 2024 3:28 PM