तपासणी सुरू
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रत्येक महत्त्वाच्या स्थानकात कोरोना तपासणी सुरू झाली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकाबाहेर सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, प्रत्येक प्रवाशाला आता ॲन्टिजन टेस्टची सक्ती करण्यात येत आहे.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास नाही
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. गतवर्षी लाॅकडाऊन काळात जिल्हा बंदी करण्यात आली होती. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास सक्तीचा केला होता. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांत कडक संचारबंदी सुरू असून जिल्हाबाहेर जाण्यासाठी मात्र पासची आवश्यकता नाही.
रस्ते मोकळे
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने कडक संचारबंदी जारी केली आहे. अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्यांना ताब्यात घेऊन कोरोना चाचणी केली जात असून वाहने जप्त केली जात आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांनाच इंधन देण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाली असून रस्ते मोकळे झाले आहेत.
रस्ते दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : औद्योगिक विकास महामंडळांतर्गत आदिष्टी बसस्टाॅप ते गद्रे मरीन कंपनीतर्फे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने या मार्गावर सुरू असते. त्यामुळे अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालक, नागरिकांमधून करण्यात येत आहे.