रत्नागिरी : जागतिक स्लिगिंग (गोफण) स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. यात चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील शेतकरी कुटुंबातील प्रकाश तांबीटकर व धामणसे येथील प्रवीण नथुराम जाधव यांचा समावेश आहे. स्पेन येथे होणाऱ्या जागतिक स्लिगिंग स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ग्रामस्थांचे श्रमदान
मंडणगड : तालुक्यातील तिडे निमदेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी एक दिवस आगळावेगळा उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छ केला. परिसर स्वच्छता मोहिमेत संगीता निमदे, सुवर्णा मोहिते, रेश्मा निमदे, पार्वती निमदे आदी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक आनंद सुतार यांनी आभार मानले.
निबंध स्पर्धेत यश
देवरूख : अमर शहीद सेवा समिती, जोधपूर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत देवरूख केशवसृष्टी येथील गुणेश विवेक भोपटकर यांना व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सैनिक, शहीद तसेच शहिदांच्या जीवनावर भाष्य करणारा निबंध या स्पर्धेसाठी क्रमप्राप्त होता.
मोकाट जनावरे
रत्नागिरी : शहरात मुख्य रस्त्यांसह नाक्या-नाक्यावर वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी जनावरे पकडण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका एजन्सीला ठेका देण्यात आला आहे. गुरे पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात येणार आहेत.
बीएसएनएलची सेवा ठप्प
रत्नागिरी : तालुक्यातील पाली परिसरातील भारत संचार निगमची सेवा गेले काही दिवस बंद असल्याने ग्राहकांनी याचा फटका बसून सेवा बंद झाल्या आहेत. अनेक शासकीय, खासगी कार्यालयातील कामकाजावर याचा परिणाम झाला असून, बँकांमधील व्यवहार कोलमडले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.