रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना ‘उमेद’ अभियानांतर्गत निधी देण्यात येताे. बचत गटांसाठी साडेसात कोटी रुपयांची मागणी करण्यात आली हाेती. मात्र, त्यांपैकी चार कोटीच प्राप्त झाले आहेत. अपुरा निधी तसेच तोही वेळेवर मिळत नसल्याने बचत गटांच्या चळवळीला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा निधी वेळेवर मिळावा, अशी मागणी बचत गटांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना एकत्र करून बचतीसह घरबसल्या रोजगाराची सवय लावण्यात येत आहे. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपले संसार उभे केले आहे. घर चालविण्यासाठी बचत गटांच्या महिला पुरुषांना चांगला हातभार लावीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात नव्याने स्थापन केलेल्या बचत गटांना १५ हजार रुपये खेळते भांडवल दिले जाते. त्यासाठी जिल्ह्याचा साडेसात कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यातील ४ कोटी रुपये मार्च, २०२१ मध्ये प्राप्त झाले. काही बचत गटांना त्याचे वितरणही करण्यात आले. परंतु अजूनही साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी येईपर्यंत बचत गटांच्या महिलांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.