राजापूर : अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांनी त्यांच्या पदांना मान्यता मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनीच आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
१०० टक्के अनुदानित असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदांवरील शिक्षकांनी आपल्या पदांना मान्यता मिळण्यासाठी यापूर्वी शिक्षण विभागाला अनेकदा निवेदने दिली आहेत. तसेच आझाद मैदानावर आंदोलने केली आहेत. परंतु अद्यापही शासनाकडून कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदांना मान्यता दिली गेली नाही. मागील १० ते १५ वर्षे पूर्ण विनावेतन काम करूनही शासन वारंवार वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागवून मान्यता देण्यात वेळकाढूपणा व दिरंगाई करीत आहे, असे या निवदेनात म्हटले आहे.
त्यामुळे अन्यायग्रस्त विनावेतन काम करणाऱ्या या कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदांवरील शिक्षक आपल्या या ज्वलंत समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनीच आपल्याच घरी राहून आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. विनावेतन काम करणाऱ्या वाढीव पदांवरील शिक्षकांना शासनाने मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-------------------------
गेल्या पंधरा वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालय वाढीव पदांवरील शिक्षक विनावेतन ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे. आज महाराष्ट्रात एमपीएससी विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर न्याय मिळाला. त्याप्रमाणे वाढीव पदांवरील शिक्षकांच्या पदांच्या मान्यतेसाठी शिक्षकांच्या आत्महत्येची शासन वाट तरी पाहत नाही ना?
- सचिन चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाढीव पद कृती समिती